पान:निर्माणपर्व.pdf/141

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 याउलट सांस्कृतिक क्रांतीची प्रक्रिया आहे. ती प्रथम माणसातील नैतिकतेला-क्रांतिकारकत्वाला आवाहन करते. जनसमूहाच्या आत्मशक्तीवर, तिच्या स्वतंत्र चलनवलनावर व नैतिक स्फुरणावर माओची श्रद्धा होती. अगदी प्रथमपासून. हीच मूलश्रद्धा पुढे सांस्कृतिक क्रांतीत परिणत झाली. मार्क्सवादाचे ते अपत्य नाही. निदान औरस तरी नाही. हे अगदी खास माओचे दर्शन आहे. चार दशकांच्या जनलढ्यातून उत्क्रांत झालेले; आशियाई, व विशेषतः चिनी परंपरेचा आधार असलेले. म्हणूनच तर ते रशियनांना कळत नाही व पाश्चात्यांना गौडबंगाली वाटते. भारतात गांधींजींमुळे ते इतके परके व अपरिचित वाटत नाही. ह्या दृष्टीने असेही म्हणता येईल की, माओ हा गांधी आणि मार्क्स यामधील मध्यबिंदू होता. गांधीजींचे हृदयपरिवर्तन आणि मार्क्सचे परिस्थितिपरिवर्तन ही दोन्ही टोके माओने वर्ज्य मानली आणि नवाच एक सुवर्णमध्य आपल्या प्रतिभावळाने सिद्ध केला. कदाचित हेच त्याच्या प्रचंड यशाचे रहस्यही असावे.


सप्टेंबर १९७६

निर्माणपर्व । १४०