Jump to content

पान:निर्माणपर्व.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

चळवळीसाठी आता तर त्यांनी आपला धंदाही जवळजवळ सोडलेला आहे. पुण्यातील ग्राहक चळवळीला अशी योग्य व्यक्ती शोधूनही सापडली नसती. बरे झाले एक प्रकारे, त्यांनी पक्षीय राजकारणातून अंग काढून घेतले. पक्षात राहिले असते तर निवडणुकांपलीकडे त्यांचे फारसे लक्ष गेलेही नसते कदाचित. आता पक्षाने परत बोलाविले तरी त्यांनी जाऊ नये. ग्राहक चळवळीला त्यांची अधिक गरज आहे.

 केवळ तेलातुपाचे, धान्याचे, वस्तूंचे वाटप नीट करणे, एवढाच ग्राहक चळवळीचा आवाका राहावा असे कुणीच मानत नाही. इष्ट दिशेने आपल्या अर्थव्यवस्थेचे पसरलेले गाडे वळवून आणणे एवढी होती सुरुवातीच्या ग्राहक चळवळीमागील संकल्पांची व्याप्ती. पाश्चात्य देशात असलेल्या ग्राहकवादाची ( Consumerism) नक्कल करणे , हा काही या चळवळीचा मुळ उद्देश नाही. ग्राहकांना योग्य भावात, योग्य दर्जाचा माल मिळवून देणे एवढीच काही या चळवळीची मूळ प्रेरणा नाही. आपल्या समाजात अनुत्पादक प्रवृत्ती फार बोकाळलेल्या होत्या -आहेत. नको त्या वस्तूंचे उत्पादनही खूप चालू असते. त्यामुळे सर्व अर्थव्यवस्थेचा तोल एकीकडे ढळतो, विषमता वाढते,देश हळूहळू कर्जात रुतत जातो. ही प्रक्रिया बदलवण्यासाठी, पालटवण्यासाठी ग्राहक चळवळीचा उपयोग व्हावा, अशी सुरुवातीची संकल्पना होती. यासाठी, उदाहरणार्थ, 'ऑपरेशन लक्ष्मीरोड' होते. केवळ पंधरा वीस टक्के भाव खाली उतरवा एवढीच मागणी या ऑपरेशनच्या मुळाशी नव्हती. दलाल हटवा असे आपण म्हणत होतो. चैनीचे, महाग कापड काढू नका, सर्वांना परवडण्यासारख्या काही ठरविक कापड प्रकारांचे उत्पादन वाढवा, या व अशा स्वरूपाच्या इतर मागण्या कशासाठी होत्या ? देशातील उद्योगधंद्यांचे केंद्रीकरण थोपवण्याचा, श्रमप्रधान नियोजनाचा, उत्पादनपद्धती व तंत्रात आवश्यक ते बदल करण्याचा विचार या सर्व मागण्यांमागे होता. पण नंतरच्या काळात या विचारांचा निकडीने हवा तेवढा पाठपुरावा झाला नाही, ही एक उणीवेची बाजूही या नुतन गृहप्रवेशाच्या वेळी आपण ध्यानात घेतली पाहिजे. काही जवळची उद्दिष्टे, तात्पुरती कामे, यात फार गुंतून पडल्यामुळे हे घडले असावे कदाचित. पण ही लांब पल्ल्याची उद्दिष्टे डोळ्याआड करून कसे चालेल? एक वाटपयंत्रणा म्हणून ग्राहक चळवळीने खूप मजबूत काम केले हे खरे आहे; पण एक स्वतंत्र शक्ती म्हणून आपला प्रभाव घडामोडींवर पाडण्यासाठी केवळ वाटपयंत्रणा पुरेशी नाही. गरुडाचा हा एक पंख झाला. पण दुसरा पंखही फडफडायला हवा. हव्या त्या वस्तूंचे, हव्या त्या ठिकाणी व पद्धतीने उत्पादन कसे व्हावे हेही ग्राहक चळवळीने हळूहळू सांगायला पाहिजे व सांगितले गेलेले, ऐकले जाण्यासाठी, अवश्य ते शक्तिसामर्थ्य गोळा केले पाहिजे. ही एक जनतेची स्वयंप्रेरित चळवळ आहे आणि संपूर्ण अर्थव्यवस्थेला इष्ट वळण लावण्याची तिची आकांक्षा आहे हे सारखे जाणवत राहिले पाहिजे. भांडारे चालवणे हे चळवळीचे उद्दिष्ट नाही असे बिंदुमाधव आपल्या प्रत्येक भाषणातून सांगत असतातच.

ग्राहकशक्ती-राष्ट्रशक्ती । १३१