पान:निर्माणपर्व.pdf/131

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


ग्राहकशक्ती-राष्ट्रशक्ती
 गेल्या आठवड्यात, रामनवमीच्या शुभमुहूर्तावर पुण्यातील ग्राहक चळवळीने एक महत्त्वाचा टप्पा गाठलेला आहे. अनेक दिवस लाखो रुपयांच्या उलाढाली, लहान मोठी आंदोलने चालू असली, तरी चळवळीला मध्यवर्ती व प्रशस्त अशी सोयीस्कर जागा नव्हती. सुधीर फडके यांच्या टिळक मार्गावरील चित्रकुटीत काही काम चाले. अडीअडचणीला 'माणूस' किंवा 'सोबत' साप्ताहिकांच्या कचेऱ्या ताब्यात घेतल्या जात. कुणाचा बंगला, कुणाची पत्र्याची शेड, वेळप्रसंगी उपयोगात आणली जाई. पण यामुळे वेळ व कार्यकर्त्यांची शक्ती फार खर्च होई व परावलंबित्वही जाणवत असे. आता जागेची ही अडचण केवळ दूर झाली आहे इतकेच नव्हे, तर नव्या वास्तूमुळे चळवळीला एक वेगळीच शान आणि उठावदारपणाही येण्यास चांगली मदत होणार आहे. अनेक वर्षे टिळक पथावरील, स. प. महाविद्यालयासमोरील जीवन रेस्टॉरंटची मोक्याची जागा धूळ खात पडली होती. मूळ मालकांपैकी श्री. बोडस जीवन रेस्टॉरंट सोडून गेल्यानंतर या जागेला ऊर्जितावस्था अशी कधी आलीच नव्हती. ही अवकळा आता दूर होऊन ग्राहक चळवळीचा गरूड आता या इमारतीवरून आकाशात अधिक उंच उंच भरारी घेत राहील यात काही शंका नाही. कारण या गरुडाची झेप आहेच तशी विलक्षण. दोन वर्षांपूर्वी चळवळ सुरू झाली आणि आज तीन-चार लाखाची मालकीची इमारत मध्यवर्ती कार्यालयासाठी घेण्याची तिची हिम्मत व्हावी, हे एक आश्चर्यच नाही का? जनतेच्या एका स्वयंस्फूर्त चळवळीने असे मजबूत यश इतक्या अल्पावधीत मिळविले असल्याचे उदाहरण निदान अलीकडच्या महाराष्ट्रात तरी दिसत नाही.लांड्यालबाड्या करून दोन-चार वर्षात संस्था, व्यक्ती उदयास येत असतात. पण स्वच्छ व्यवहारांवर, काटेकोर हिशोबांवर ग्राहक चळवळीच्या सूत्रधारांचा पहिल्यापासूनच कटाक्ष आहे. ही सर्व उचित व्यवहारांची पथ्ये सांभाळून ग्राहक चळवळीने स्वतःसाठी अशी डोळयात भरणारी जागा हस्तगत करावी याचे कुणालाही कौतुकच वटेल. या धडाडीबद्दल ग्राहक चळवळीच्या चालकांचे - विशेषतः श्री. बिंदुमाधव जोशी यांचे, सर्वांनी अभिनंदन करायला हवे. कारण इतरजण सल्लागार, मदतनीस, सहकारी वगैरे असले तरी दिवसरात्र या चळवळीसाठी वेडे होऊन राबणाऱ्यांमध्ये बिंदूमाधवच सतत आघाडीवर राहिलेले आहेत.

निर्माणपर्व । १३०