पान:निर्माणपर्व.pdf/110

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आता मुख्य आव्हान साम्यवादाचे आहे. आपले विषमतेचे, दारिद्रयाचे प्रश्न साम्यवाद सोडवू शकतो, असा विश्वास जनसामान्यांना वाटत आहे. चीन, व्हिएटनाम या जवळच्या देशात साम्यवादी राजवटी येऊन त्यांनी हे प्रश्न सोडवून दाखविल्याचा इतिहास आहे. साम्यवाद आणि राष्ट्रवाद यांचे बेमालूम नवीन मिश्रण या देशात तयार झाले आणि गर्तेतून हे देश पाहता पाहता वर आले. आपण लोकशाही मार्गाने हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न चालविलेला आहे. आणि लोकशाही मार्गाने प्रश्न सुटायचे, तर संघासारख्या सांस्कृतिक संघटनांनी, आर्थिक-सामाजिक क्षेत्रातील आव्हानेही स्वीकारायची तयारी ठेवली पाहिजे. साम्यवाद हे विषमतेवरचे औषध आहे. भांडवलशाहीने विकास होतो, पण हा विषम विकास असल्याने, साम्यवादाची निकड भासू लागते. लोकशाही मार्गानेही विषम विकास प्रक्रिया कशी रोखता येईल हा खरा आपल्यासमोरचा जटिल प्रश्न आहे. गेल्या पंचवीस-तीस वर्षात देशाचा विकास झालाच नाही असे आपण म्हणू शकत नाही. हा वारसा नाकारण्यात अर्थ नाही; पण हा वारसा सर्वांना मिळायला हवा, यातही काही संशय नाही. हे कसे साध्य करणार ? व्यक्तीचे स्वातंत्र्य, समाजातील मोकळे वातावरण कायम ठेवून ही समानतेची गरज आपण कशी भागवणार ? लोकसेवकांची फौज हे या प्रश्नाचे एक उत्तर आहे. हे लोकसेवक किंवा रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, सत्तेच्या दैनंदिन खेळात अडकणार नाहीत. पण दूर कुठेतरी अंतराळात, मठा-आश्रमात वावरूनही त्यांना चालणार नाही. तटस्थता, अलिप्तता हवी. पण तुटकपणा, सोवळेपणा नको. यासाठी पर्यायी संस्कार केंद्रे, लोकाभ्युदय केंद्रे त्यांनी उभारली पाहिजेत. शासकीय प्रयत्नांशी कधी समांतर, कधी विरोधी, कधी समन्वय साधून हे कार्य लोकसेवकांना करावे लागेल. पण यापैकी कुठलेही नाते प्रसंगानुरूप जोडले तरी शेवटी सेवकांचे अधिष्ठान ‘लोक' हे राहिले पाहिजे, सत्ता नव्हे-सरकार नव्हे. आपल्याकडील लोकशाहीचा प्रयोग यशस्वी व्हायचा, अभ्युदयाची आपली वाटचाल पूर्ण व्हायची, तर, हा स्वतंत्र, स्वायत्त लोकसेवक, राष्ट्रसेवक-अशांची संघटित शक्ती उभी राहणे अत्यंत अवश्य आहे. रथाचे हे दुसरे चाक आहे-व्हायला हवे. एक चाक सरकार दुसरे, एखादा आश्रम, खेड्यापाड्यातील एखादे चळवळकेंद्र किंवा संघशाखा हे ठरायला हवे यातले एकही चाक निखळून चालणार नाही. एकात दुसरे अडकूनही उपयोगी नाही. साम्यवादी पर्याय नको असेल, तर ही दोन्ही चाके जागच्या जागी असली पाहिजेत, पुढे पुढे सरकली पाहिजेत. सारथी अर्थातच श्रीकृष्णासारखा, गांधीजींसारखा-मोकळा, निराळा, वेगळा हवा हे उघडच आहे.


साम्यवादी पर्याय नको असेल तर ! । १०९