पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फिरत पंढरपूरला आले. तेव्हा इथं आषाढी वारी होती. तो काळ १९२८ चा असला तरी लाखावर वारकरी होते... एवढी गर्दी त्यांनी पहिल्यांदाच पाहिली... आणलेला माल हातोहात विकला जाईल म्हणून भरपूर माल मागवला; पण विक्री होऊनदेखील माल अंगावर पडला म्हणून वारी संपली तरी विकत राहिले... तोवर कार्तिक वारी तोंडावर आली म्हणून परत माल मागवला... परत 'ये रे माझ्या मागल्या!' परत चैत्रवारी असं करत वारीच्या चक्रात घुटमळून गेलेले हबीबभाई पंढरपूरकर केव्हा झाले हे त्यांचं त्यांनासुद्धा कळलं नाही. अगोदर फिरता व्यापार... मग रस्त्यावर... मग दुकान...घर करत पदरी तीन मुलं- अजिज, सलीम व दाऊद यांना घेऊन हबीबभाई व नूरबानो पंढरपूरच्या समाज जीवनाचं अभिन्न अंग बनले.
 आई चार वर्षांची असताना वारल्यानं अजीजभाईंचं शिक्षण, राहणं अनाथ मुलापेक्षा वेगळं नव्हतं...कधी आत्या...कधी काका...या प्रकारामुळे अजीजभाईंना आश्रमातली मुलं-मुली आपली वाटणं स्वाभाविक होतं...पूरग्रस्त विस्थापित...फाळणीने निर्वासित... धर्माने गुजराती मुसलमान... असं दुय्यम जिणं लाभलेल्या अजीजभाईंना सतत समाजातील उपेक्षितांबद्दल वाटत राहायचं. पूर ओसरला आणि नारळी पौर्णिमा आली...आश्रमानं आपल्याला तारल्याची कृतज्ञता ठेवून अजीजभाई राख्या घेऊन आश्रमात. केवळ मुलं आणि मुली म्हणून जगणारे या छोट्या कृतीनं भाऊ-बहीण झाले...पुढे दसरा आला, अजीजभाई सोनं घेऊन आले...'सोनं घ्या...सोन्यासारखं राहा' म्हणून त्यांनी अनाथ कुटुंबात माणुसकीची ऊब भरली... त्यांचं येणं परिसस्पर्शापेक्षा कमी नव्हतं. सतत रडत, कण्हत आयुष्य कंठणारे आश्रमवासी 'दिस आज सोनियाचा...'गुणगुणत आनंदी झाले. दिवाळी आली...अजीजभाई फटाके, फुलबाज्या, उटणं, वासाचं तेल, भाऊबीजेला ब्लाऊज पिसेस घेऊन दत्त! बरं यांचं वय त्या वेळी मोठं नव्हतं... अवघ्या विशीतला तरुण हा!
 हबीबभाईंना मुलांची लक्षणं ठीक दिसेना. मिळवायचं सोडून घालवणारा हा मुलगा त्यांनी गल्ल्यावरून उठवला अन् त्याला पिटाळत राहिले खरेदीसाठी मुंबई, सुरत, भावनगरला. तरी त्यांची उधळपट्टी ठरलेली...विचारलं की यांचं ठरलेलं उत्तर, "आपल्याला काही कमी आहे का? दिलं म्हणून काही कमी पडलं का? कोण उपाशी राहिलं का?" पुढे भाऊ दुकान सांभाळायला लागले. अजीजभाई मात्र उदार कर्ण! कुठं अन्नछत्र चालव, कुठं याला मदत दे. या संस्थेच्या कार्यक्रमाला जा. ते घरी नि व्यापारात गरजेपुरते असले तरी मिळवण्यात हिशेबी, खर्चात बेहिशेबी!

निराळं जग निराळी माणसं/८९