पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सार्वजनिक पप्पा - अजीजभाई भयाणी

 तुम्ही जेव्हा कोणीच नसता, तेव्हा तुम्हाला जो मदतीचा हात देतो तो खरा माणूस! सारं जग अंधारून आलंय, आपलं कोणीच नाही, पाहावं कुणाकडे असं वाटत असताना, जो आपल्याकडे पाहून हसतो, आपल्या पाठीवरून मायेचा हात फिरवतो, खांद्यावर हात ठेवून, 'तू चालत राहा, मी आहे' म्हणतो, तो आपला! केवळ रक्तानं, पदरानं जोडलेली नाती सांगायला पुरेशी असतात; पण आयुष्याचा प्रवास त्यांच्या भरवशावर करता येत नाही. असा दिलासा एकालाच नाही... व्यक्ती, संस्था, संघटना, उपक्रम अशा साऱ्यांना अभय देणारे पंढरपूरचे अजिज भयाणी म्हणजे अजात समाजपुरुष!
 मी त्यांना गेली पन्नास वर्षं पाहात आलोय. पंढरपूरला 'वा. बा. नवरंगे बालकाश्रम' आहे. तिथे १९५५-५६ च्या दरम्यान एक दिवसाच्या अर्भकापासून ते १०० वर्षांच्या वृद्धांपर्यंत ३००-३५० मुलं, मुली, महिला होत्या. अनाथ, निराधार, कुमारीमाता, परित्यक्ता यांचं ते मोठे कुटुंबच होतं. १९५६ ला पंढरपूरच्या चंद्रभागेला महापूर आला. नदीकाठचं सारं जुनं गाव पाण्याखाली गेलं...अनाथ, निराधार झालेल्या पंढरपूरच्या रहिवाशांना या आश्रमानं आश्रय दिला. अजिज भयाणीचं दुकानही या वेळी पाण्यात होतं... आजवर आश्रमात न डोकावणारे कितीतरी या निमित्ताने आश्रमात आले होते. त्यात अजीजभाई होते... या निमित्तानं त्यांनी आश्रम पाहिला अन् त्यात त्यांना आपलं बालपण दिसलं...तिथल्या रडणाच्या मुलांच्या चेहऱ्यावर आपले विरलेले अश्रू दिसले!
 अजीजभाईंचे वडील हबीबभाई. ते मूळचे भावनगर गुजरातचे. वडिलोपार्जित व्यापारी. ते भारतभर फिरून स्टेशनरी, कटलरी, कॉस्मेटिक विकायचे. एकदा

निराळं जग निराळी माणसं/८८