पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ऐन तारुण्यात त्यांनी पंढरपूरच्या नाथ चौकात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. हे सिंधी, भक्ती गणपतीची! विचारलं की म्हणत, 'जलाराम काय आणि प्रभूराम काय? सर्व रामच ना? सारी माणसं सारखी, तसे देवही सारखे!' हे त्यांचे जीवन तत्त्वज्ञान आलं कुठून? तर जगण्यातून, लहानपणाच्या अनाथपणानं, पूर्वजांच्या निर्वासितपणामुळे आणि वडिलांच्या कष्टांनी त्यांना समाजभान दिलं. 'दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास' हा एकच घोष कानी घुमत ठेवणारे अजीजभाई... त्यांचं सारं जीवन म्हणजे आपल्या आयुष्यातील उणेपणाचं उदात्तीकरण!
 अजीजभाईंना आपला मुलगा आमीरला- इंग्रजी शाळेत पाठवायचं होतं; कारण सरळ होतं की परिस्थितीमुळे ते स्वत: आठवीच्या पुढे शिकले नव्हते...मुलानं शिकावं, मोठं व्हावं हे स्वप्न, पण घरात त्यावरून महाभारत घडलं. आता त्यांच्या लक्षात आलं की, आपली जगण्याची तऱ्हाच निराळी, तेव्हा स्वतंत्र राहणं बरं! आमीरला इंग्लिश शाळेत पाठवू न शकल्याचं शल्य या माणसानं कसं दूर करावं? तर पंढरपूरला इंग्लिश मिडियम स्कूलच सुरू केलं. कारण काय तर, आमीरसारखं दु:ख इतर मुलांच्या वाट्याला येऊ नये! नुकताच या शाळेने रौप्यमहोत्सव साजरा केला... दोन एकराचा परिसर, कोटीची इमारत...संगणक शिक्षण...त्यामुळे पंढरपूरच्या पालकांची व विद्यार्थ्यांची पहिली पसंती अजीजभाईंची शाळा. पण परत अजिजभाई तेथूनही पसार. 'तुमचं माझं जमत नाही, तुम्ही हे पाहा. मी दुसरं पाहतो', असं म्हणत.
 अजीजभाईंनी काहीही केलं तरी यश ठरलेलं! कारण ते निरपेक्ष, परसुखाय...परमानंदी असतं! स्वतंत्र झाले नि चहाचं दुकान सुरू केलं...ते फायद्यात. मग फुटवेअर... ते फायद्यात...मग शेती...प्रयोग केले, तरी फायद्यात! आसपास पाण्याचा थेंब नाही...यांच्या विहिरीला मात्र बारोमास पाझर! मी एकदा विचारलं, "हे कसं काय?" म्हणाले, "मी जे करतो तेच मुळी दुसऱ्यांसाठी असतं...मग काय कमी पडणार? विहीर दुसऱ्यांना पाणी देण्यासाठी खोदली तर पाणी लागणारच!"
 अजीजभाईंनी ५० वर्षांपूर्वी पंढरपूरजवळील गादेगाव रस्त्यावर शेती घेतली ती अनाथाश्रमातल्या मुलांना मामाच्या गावी जाता यावं म्हणून! हा अनाथाश्रमातल्या मुलांचा 'मामाचा गाव' आता निराश्रितांचे आनंदवन झालाय! वृद्धाश्रम, प्रभाहीरा बालगृह या सर्वांना दिवाळीत आठवण येते ती अजीजभाईंची! पन्नास वर्षांपूर्वी हुर्डा पार्टी करणारी अनाथाश्रमातील मुलं-मुली आता आजीआजोबा झाली. ती आपल्या जावई, सुना, नातवंडांसह आता या आनंदवनात

निराळं जग निराळी माणसं/९०