पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राज्य परिवीक्षा व अनुरक्षण संघटनेच्या हीरक महोत्सवानिमित्त सांगलीस योजला होता, त्यास दादा आल्याचे व तत्पूर्वी सांगलीतच तेरेदेस होम्सच्या कार्यकर्ता शिबिरातही वेलणकर मंगल कार्यालयात ते आल्याचं आठवतं. या संपर्कातून दादांना मी ओळखू लागलो. एकदा आवर्जून मी दादांची वेळ घेऊन श्रद्धानंद महिलाश्रमाचं कार्य पाहिलं होतं. ते कार्य व माझ्या बालपणी बाबासाहेब जव्हेरी ज्या प्रकारे कार्य पंढरपुरी करायचे ते कार्य या दोहोंत विलक्षण 'घरपण' भरलेलं होतं. पण हे घरपण अगोदर पंढरपूरच्या आश्रमानं निर्माण केलेलं होतं.
 दादा ताटके यांचं श्रद्धानंदच्या माध्यमातून झालेले कार्य हा महाराष्ट्रातील अनाथांच्या कार्याचा एक नवा वस्तुपाठ होता. ख्रिश्चन मिशनरी व ब्रिटिश समाजसुधारक अधिकारी यांनी सुरू केलेल्या कार्यापासून प्रेरणा घेऊन महात्मा फुले, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई, प्रार्थना समाज, आर्य समाज यांनी केलेलं अनाथांचे कार्य व दादा ताटके यांनी केलेले कार्य यात अनेक अंगांनी फरक होता. दादा ताटके श्रद्धानंद महिलाश्रमाशी जोडले गेले ते आश्रमाच्या शेजारी राहात असल्यानं आणि एका अडचणीच्या प्रसंगातून. पुढे आश्रमाचा सन १९५३ साली रजत महोत्सव साजरा झाला. त्यात दादा ताटके स्वयंसेवक बनून दिसेल ते काम करत राहिले; पण त्यांची निष्ठा, समर्पण सर्वांच्या लक्षात आली. पुढे ते आश्रमाचे सभासद झाले. त्या काळात सन १९५६ ला 'महिला व मुलींच्या अनैतिक व्यापाराला बंदी घालणारा' कायदा आला. त्या कायद्यानुसार मुली व महिलांचा सांभाळ करणा-या संस्थांना परवाना घेणं बंधनकारक झालं. श्रद्धानंद महिलाश्रम, तर त्या अगोदरपासूनच हे कार्य करत असल्यानं त्यांना कायद्यातील त्रुटी जाणवत होत्या. हे शासनाच्या लक्षात आणून देणं आश्रमास गरजेचं वाटलं; पण तर्कशुद्ध व कायदेशीर प्रतिवाद करतच हे काम करणं गरजेचं होतं. दादा ताटके तेव्हा विमा इ. कार्य करायचे. कार्यालयीन कामाचा त्यांचा अनुभव मोठा होता म्हणून आश्रमांनी दादांची मदत घ्यायचं ठरवलं. दादांनी तेही काम मनापासून केलं. यातून दादा आश्रमाशी जोडले गेले ते ऑगस्ट १९९० पर्यंत. म्हणजे स्वेच्छानिवृत्त होईतो.,br> सन १९५७ च्या वार्षिक सभेत दादा ताटके सर्वाधिक मतांनी निवडून आले व कार्यकारी मंडळाचे सदस्य बनले. त्या वेळी त्यांचं वय ४२ वर्षांचं होतं. दादा सकाळी सातला आश्रमात नियमित येत. घरी धोतर-सदरा, सोवळे असा वेश असला तरी उंबऱ्याबाहेर त्यांचा पोषाख सूट, बूट, टाय, हॅट असा असायचा. व्ही.जे.टी.आय. मधील नोकरी त्यांनी बर्ले या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या हाताखाली केली होती. त्याचा हा प्रभाव होता. दादांचे इंग्रजी चांगलं असणं,

निराळं जग निराळी माणसं/७२