पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनाथ महिलांचा आधारवड : दादासाहेब ताटके

 मी पंढरपूरच्या वा. बा. नवरंगे बालकाश्रमात विद्यार्थी असल्यापासून मुंबईतील माटुंगा उपनगरात असलेल्या श्रद्धानंद महिलाश्रमाबद्दल ऐकून होतो. त्या वेळी या दोन्ही आश्रमातील, मुलं-मुली प्रसंगपरत्वे या संस्थेतून त्या संस्थेत येत-जात असायची. नंतर या संस्थेचा माझा परिचय झाला तो मी पीएच.डी. होऊन अनाथ मुले, मुली, महिलांच्या संगोपन, शिक्षण, सुसंस्कार, पुनर्वसन कार्य करायला लागल्यावर. त्या काळी संस्थेत अनाथ अर्भकं येत असायची. मुंबई, पुणे वगळता अशा मुलांचा सांभाळ व पुनर्वसन (दत्तक) कार्याबद्दल फार जाणीव-जागृती ना समाजात होती ना शासन यंत्रणेत. त्या वेळी भारतीय पालक गुप्तपणे मुलं दत्तक घेत तेही मुलंच. मुली विदेशी दत्तक जात. मुले विदेशी दत्तक जातात. त्यांचे धर्मांतर होते, संस्था मुले विकतात अशी ओरड वृत्तपत्रांतून अधी-मधी होत राहायची. त्या वेळी श्रद्धानंद महिलाश्रमातून, तर दरवर्षी शंभरच्या घरात मुलं विदेशी दत्तक जायची. 'एल.के. पांडे विरुद्ध भारत सरकार' या दत्तकसंबंधी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने 'सर्वप्रथम सर्व मुलं भारतातच द्यायला हवीत, काही कारणाने देणे शक्य नसेल, तर तीनदा नाकारल्यावर परदेशी दत्तक द्यावे' असा निर्णय दिला. यानुसार 'कारा' (Central Adoption Resource Agency) अस्तित्वात आली. सन १९६७ पासून श्रद्धानंद महिलाश्रमातील मुलं परदेशी दत्तक जायची. त्यामुळे या प्रश्नी होणाऱ्या वाद-विवादात श्रद्धानंद महिलाश्रमाचे सर्वेसर्वा असलेले रा. शं. तथा दादासाहेब ताटके यांचं म्हणणं, विचार, अनुभव सर्व संस्थांना मार्गदर्शक होता. अशाच एका संस्था कार्यकर्ता मेळाव्यात जो आम्ही महाराष्ट्र

निराळं जग निराळी माणसं/७१