पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कामाची शिस्त, वक्तशीरपणा सारा ब्रिटिशांना लाजवेल असा. समर्पण, सद्भाव, प्रेम, मातृत्व सारे गुण घरातील परंपरा, संस्कारातून आलेले. दादांनी काम सुरू केल्यावर सर्वांत मोठे नि क्रांतिकारी कार्य केले ते म्हणजे संस्थेच्या 'श्रद्धानंद अनाथ महिलाश्रम' नावातील 'अनाथ' शब्द काढून टाकला. त्यांचं म्हणणं होतं की, "आश्रम कन्यांना आपल्या अनाथपणाचा विसर पडावा, ही आश्रमाची धडपड. त्याच्याशी हा शब्द विसंगत वाटतो." अन् ते कालसंगतही होतं. दादांनी सरकार दफ्तरी सारे सोपस्कार, पत्रव्यवहार करून संस्थेचे अनाथपण दूर केलं.
 दादांचं मोठेपण नुसतं नाव विसर्जित करण्यात नव्हतं. त्यांनी आश्रमास आर्थिक अभय पण मिळवून दिलं. समाजातील प्रतिष्ठित, धनिकांना ते विविध समारंभाच्या निमित्ताने बोलवत. त्यांना स्वतः संस्था फिरवून दाखवत. कोणी मोठा पाहुणा येणार असेल, तर आपल्या विमा कंपनीतील नोकरीतून रजा घेत. त्यांच्या साऱ्या रजा आताशा आश्रमासाठीच खर्च होऊ लागलेल्या. दादांच्या संस्था दाखविण्यात, माहिती सांगण्यात समोरच्या माणसाच्या हृदयात दयाबुद्धी जागवून त्यास साहाय्य करायची भावना निर्माण करण्याचे विलक्षण कौशल्य होतं. आलेला प्रत्येक जण भारावून जाऊन ओंजळ भरभरून मदत करायचा, दादा पाठपुरावा करत राहायचे. ओघ सतत वाहत राहायचा.
 यातून आश्रमातील परित्यक्ता स्त्रियांना स्वावलंबी करणारं 'परिश्रमालय' उभारलं. दादांनी त्यासाठी प्रिमियर, क्रॉम्प्टन सारख्या मोठ्या कंपनीची कंत्राट मिळवली. या केंद्रास फॅक्टरी ऍक्टमधून 'कल्याणकारी कार्य' म्हणून सूट मिळविली. पुढे कामगार संघटनेने संप, युनियन केल्यानंतर कोर्ट-बाजी झाली. त्यात संस्थेच्या बाजूनं निकाल लागण्यात व निकालात संस्थेच्या कार्यासाठी प्रशंसा मिळविण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.
 आश्रमातील मुलं दत्तक जावीत म्हणून दादांनी भाषणे, निवेदने इ. द्वारे वृत्तपत्र, रेडिओमधून समाजप्रबोधन केलं. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. तरी सर्व मुले दत्तक जात नसत. मग एका विदेशी जोडप्यास बाळ दत्तक दिलं. त्यातून विदेशी दत्तक देणं सुरू झालं. मग दादांनी मागं पाहिलं नाही. याचा एक फायदा झाला. संस्थेचे कार्य जगभर पसरलं. संस्थेस परदेशातून मदत मिळू लागली. संस्थेस आर्थिक स्थैर्य लाभलं. परिश्रमालयाचा फायदा, विदेशी साहाय्य, देणगी इ. तून संस्थेच्या विकास योजनांना मूर्त रूप आलं. दाटीवाटीनं राहणारी मुलं, मुली, महिला त्यांना प्रशस्त जागा मिळाली. अर्भकालय, मुली,

निराळं जग निराळी माणसं/७३