पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

घेऊन जायची. तिच्या काळजीनं तिथंच वाट बघत बसायची. नुसतंच कशाला बसायचं म्हणून पर्स करायला शिकले. आता सँक, कव्हर्स करते. मुलींची लग्नं मी माझ्या कमाईतून केली. घरभाडे मीच भरते. आता घर बांधीन.
 * अंजना घाटे : अडाणी होते. घरी भिशी चालवायचे. ती अंगावर आली म्हणून फेडायसाठी राजगिरा भाजायला जायचे. तीस रुपये रोज मिळायचे. 'स्वयंसिद्धा'नी मला लाडू शिकवले. आता माझे लाडू सगळ्या मॉल, बझारमध्ये असतात. पिठलं भाकरी, अनारसे पण माझी स्पेशालिटी. दिल्लीला जाऊन करून दाखवून आले. आता मी चाळीस हजार कमावते. सही करते. हिशेब ठेवते. टॅक्स भरते. हाताखालच्या बायकांना 'स्वयंसिद्ध' करते.
 या नि अशा हजारो महिलांना स्वावलंबी, स्वयंप्रेरिका, सबला बनविणारी एक चळवळ कोल्हापुरात कार्यरत आहे. कांचन परूळेकर त्या चालवतात. अवघ्या १८ वर्षात स्त्री-पुरुष सज्ञानी, स्वावलंबी होणं ही क्रमागत गोष्ट असते. पण एखादी संस्था, चळवळ, विचारानं १८ वर्षांत स्वावलंबी होणं केवळ बांधिलकीमुळेच शक्य असतं! एक महिला पेटून उठली तर काय करू शकते, याचा कुणाला शोध घ्यायचा असेल त्यांनी कांचन परूळेकर नावाच्या एका स्वयंसिद्ध महिलेचे कार्य, एका स्वयंसिद्ध ठरलेल्या संस्थेचा इतिहास आणि स्वयंप्रेरिका बनलेल्या महिला लोकआंदोलनाचा धांडोळा घ्यायला हवा. 'स्वयंसिद्धा' ही महिलांचे प्रबोधन करून, त्यांना प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर, स्वावलंबी करणारी संस्था आहे. सौ. सरोजनीदेवी विश्वनाथ विश्वस्त मंडळामार्फत ती चालविली जाते. स्त्री शक्ती विधायक व उत्पादक (खरं तर रचनात्मक) बनविणारी ही संस्था महिलांनी महिलांकरिता चालविलेलं सक्रिय सबलीकरण होय.
 कांचनताई परुळेकरांचा जन्म सन १९५० चा. वडील बाळकृष्ण परूळेकर हे ग्रामीण भागातील सक्रिय कार्यकर्ते. व्यवसायाने म्हणाल तर कोटमेकर; पण सारं लक्ष शेतकरी, धरणग्रस्तांच्या चळवळीकडे. त्यामुळे व्यवसायाकडे यथातथाच लक्ष. परिणामी पत्नीलाच दुकान सांभाळावं लागायचं. पदरात दोन मुलं, मुलगी कांचन मोठी व्हावी, असं बापाला वाटायचं. ती लहानपणीच प्रभावी भाषणं करायची. एकदा ते पाटगाव धरणग्रस्त परिषदेस आपल्या मुलीस घेऊन गेले. व्यासपीठावर तत्कालीन खासदार ऍड. व्ही.टी.पाटील, आमदार देशभक्त रत्नाप्पा कुंभारांसारखे दिग्गज, हजारो धरणग्रस्तांपुढे १३ वर्षाची चिमुरडी, कांचन असं प्रभावी भाषण करते की, महाराष्ट्रातील वरील नामांकित नेते चारीमुंड्या चीत. व्ही.टी.पाटील त्या मुलीला दत्तक घेतात. ही मानसकन्याच. पुढे त्यांच्या कार्य- कर्तृत्वाची वारसदार बनते. वडिलार्जित संपत्तीवर रक्त,

निराळं जग निराळी माणसं/३८