पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाळ, आतडं, पदर, जात, भावकीचा आधार, वारस बनण्यात पुरुषार्थ असत नाही. कर्तृत्वाची गादी चालवायला तुमच्यात जन्मतः हिंमत असावी लागते. ती कांचनताईंमध्ये होती.
 त्या एम.ए., डी.एड्., सी.ए., आई.आई.बी. झाल्या. हायस्कूल शिक्षिका, एन.सी.सी. ऑफिसर होत बँकेत गेल्या. असिस्टंट मॅनेजर असतानाच त्यांना वाटू लागलं की, आपण काकाजींचे (व्ही.टी.पाटील) वारस म्हणून मिरवतो. तर त्यांच्यासारखं कार्य करायला हवं. त्याची सुरुवात त्यांनी शैक्षणिक क्षेत्रापासून केली. काकाजींनी गारगोटीचं श्री मौनी विद्यापीठ हे ग्रामीण शिक्षणाचे केंद्र 'शिक्षणातून विकास व विकासातून सामाजिक परिवर्तन' या ध्येयानं उभारलं होतं. कोल्हापूरचं ताराराणी विद्यापीठ उद्याची स्त्री रणरागिणी, कर्तृत्ववान, स्वावलंबी व्हावी म्हणून उभारलं होतं. कांचनताई तिथं औपचारिक शिक्षणाचं काम करायच्या. मुलींना शिष्यवृत्ती, महिला प्रबोधन हे त्यांना बंदिस्त व रुटिन वर्क वाटत होतं. त्यांनी काकाजींशी सल्लामसलत करून अनौपचारिक शिक्षणाचा मार्ग चोखाळायचा ठरवलं.
 त्यांनी ताराराणी विद्यापीठात एक महिला मेळावा भरवला. तो अनेक अंगांनी क्रांतिकारी ठरला. काकाजींनी स्थापन केलेलं दैनिक पुढारी जिल्ह्याचं मुखपत्र; पण तिथंच त्यांचे कार्य छापून येत नसे. कांचनताईंनी या मेळाव्यास त्या दैनिकाच्या संपादकासच प्रमुख पाहुणा म्हणून बोलावलं. त्यामुळे मेळाव्यापूर्वी प्रचाराचं निवेदन आलं. त्यात आवाहन होतं... ज्या महिला शिकून घरी बसलेल्या आहेत... ज्यांना फावला वेळ सत्कारणी लावायचा आहे... ज्या महिलांना स्वावलंबी बनायचं आहे, अशांसाठी मार्गदर्शन भाषणं नाहीत... प्रात्यक्षिकं...या, पाहा, शिका आणि मिळवत्या व्हा! मोठ्या संख्येनं महिला आल्या. त्यांच्यापुढे मिळवत्या महिलाच उभ्या केल्या. 'हे होऊ शकतं', 'आपण हे करू शकतो', 'ती अडाणी मिळवते मी तर सुशिक्षित'... असे संवाद सुरू झाले... घरोघरी मेळावा पोहोचला. वारुळात पाणी शिरलं की मुंग्या बाहेर पडतात. कानात हा वारा गेला अन् घरोघरीचे उंबरे महिलांनी ओलांडले.
 आज स्वयंसिद्धा संस्थेत पर्सेस, बॅग्ज, स्क्रीन प्रिंटिंग, वाखाच्या वस्तू, कुशन्स, ब्युटी कल्चर, वर्मी कल्चर (गांडूळ शेती), हस्तकला, मूर्तिकाम, भरतकाम, पेंटिंग, रांगोळी, मेंदी (आणि मेंढी पालन, शेळी पालन पण!) फोटोशॉप, संभाषण वर्ग, योगासन, जिम, हनिकोम व स्मॉकिंग, ड्रायक्लिनिंग काय नाही असा प्रश्न पडावा इतका पसारा. आज १५० कार्यकर्त्या प्रशिक्षक महाराष्ट्रभर प्रशिक्षण देत फिरतात. ते प्रशिक्षण शासकीय वांझ, वेळकाढू व

निराळं जग निराळी माणसं/३९