पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्त्री विकासाचा स्वावलंबी प्रयोग : स्वयंसिद्धा

 * शीतल पाटील : मी मोरेवाडी, जि. कोल्हापूरच्या एका प्राथमिक शिक्षकाची बायको. बारावी पास. घरात बसून होते. 'स्वयंसिद्धा'कडून नवऱ्यानं गांडूळ खताची पेटी आणली. पहिल्यांदा तर मला गांडूळ बघून शिसारीच यायची. स्वप्नातबी ती वळवळायची. कर्ज फेडायचं म्हणून खत करू लागले, आता मीच कर्जाऊ खत देते. माझ्यामुळे गाव बदललं. आमच्या शेतातली गर्किन काकडी, बेबी कॉर्न फ्रान्सला जातात. महिला सामुदायिक शेती, बचत गट, दूध, भात, शेती इ. द्वारे आता माझं उत्पन्न वार्षिक दोन लाख रुपये झालंय.
 * संगीता कांबळे : मूल नसल्यानं मी निराश होते. रडत दिवस काढायचे. 'स्वयंसिद्धा'च्या संपर्कात आले. फार्मासिस्ट असून घरी होते. तरंगत्या मेणबत्त्या करायला शिकले. आज मी त्यात मास्टर आहे. प्रशिक्षण ते उत्पादन सर्व शिकले. कधी काळी 'अबोली' असलेली मी 'बडबडी' झाले. मला ऐकताना पुरुषांची बोबडी वळते.
 * दीपक कांबळे : मी ग्रामीण भागातला बेकार युवक होतो. फोटोग्राफीची आवड होती. 'स्वयंसिद्धा'नं मला कॅमेरा दिला. प्रशिक्षण दिलं. आज मी फोटोग्राफीचं प्रशिक्षण देतो. व्यवसाय उत्तम. माझी प्रदर्शन होतात. चित्रं हजारांना विकली जातात.
 * बिस्मिल्ला मुजावर : माझी मुलगी दहावी नापास होऊन घरी होती. 'स्वयंसिद्धा'च्या 'ज्योतीस्कूल' या नापासांच्या शाळेबद्दल कळलं. पोरीला

निराळं जग निराळी माणसं/३७