पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

निर्वाळा दिला, तेव्हा याचिकाकर्त्याच अचंबित! मग जिल्हा सत्र न्यायाधीशांनी भेटी दिल्या. पुढे मानवाधिकार आयोगानंही एक अहवाल जाहीर केला अन् वास्तव जगासमोर आलं. जगासमोर आलेलं मनोरुग्णांचं निराळं जग कोणत्याही संवेदनशील माणसास व्यथित, चिंतित करणारं, शहाण्या माणसांचा सारा समाज खुळ्यांची चावडी ठरवणारं, सिद्ध करणारं!
 मी काम करत असतानाचे प्रसंग आठवतात. सिंधू कोल्हापूरच्या कपिलतीर्थ मंडईत भाजी विकून पोट भरायची. ती लहानाची मोठी कशी झाली. इथं कशी आली, भाजी केव्हापासून विकते; सारा इतिहास मठ्ठ अंधार! निराधारांना ना वंश, ना जन्म, ना नाव, ना नाती, ना रक्त, ना वंशावळ, ना इतिहास. आला क्षणच त्यांचं सत्य. वर्तमानच त्यांचे जीवन, ना घर, ना घाट! तिच्यावर झोपेत असताना कुणा नराधमाने बलात्कार केला. तशी ती पिसाट, मोकाट, वेडीपिशी झाली! पुरुष जातीची दिसताक्षणी ऍलर्जी झालेल्या सिंधूला आम्ही रत्नागिरीच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार करून नॉर्मल केलं. तिचं संस्थेमार्फत रीतसर बाळंतपण झालं. बाळ झालं. तशी ती थंड, शांत झाली; पण तरीही वेडीच. बाळाची तपासणी केली, ते रडवं होतं. सिंधू सांभाळू शकेल, असं वाटेना म्हणून बाळ अलगद काढून घेतलं. हळूहळू ती बाळाला विसरली. तिच्या बाळाला आम्ही दत्तक दिलं. ती सांभाळू शकत नव्हती. शिवाय तिला पाशमुक्त करायचे म्हणून. संस्थेत एकदा दोन मुलींची लग्नं एकाच वेळी होती. मी त्या गडबडीत होतो अन् सिंधू ऑफिसात आली. लाजत, मुरडत, लटकेच म्हणाली, "दादा माझं बी लगीन करा की." ती तिच्या नॉर्मल होण्याची मी खूण मानली. मनोविकार तज्ज्ञांशी, डॉक्टरांशी चर्चा केली. औषधोपचार सुरूच होता. तिला कोकणात दिली. तेथे ती रमली; पण मध्ये मध्ये वेड उचल खायचं. तरीही ती नांदत होती. तिचा शेवट मात्र चांगला झाला नाही. कुंपणानंच शेत खाल्लं.

 मनोविकारग्रस्त रुग्णांना, उपचारक्षम अपंगमतींना मानव अधिकार संकल्पनेनुसार जगण्यासंबंधीचे काही मूलभूत अधिकार दिलेत. त्यांना सन्मानानं जगण्याचा हक्क, उपचार हक्क, संपत्तीत समान वाटा, त्यांच्या मतांचा आदर अशा अनेक गोष्टी त्यात अंतर्भूत आहेत. 'जाम'सारखी संस्था त्यांना मताधिकार, निवडणूक, भागीदारी इ. हक्कांपासून वंचित ठेवणाच्या शहाण्यांच्या कालबाह्य समाजाविरुद्ध लढत आहे. वेडा आहे, उपचार असह्य आहे म्हणून कुणाला मारता येत नाही. इच्छामरणही देता येत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाचे निकालच सांगतात. जग आज प्रगल्भ झालंय. कुणाला आता वेडं, अपंग

निराळं जग निराळी माणसं/२५