पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

म्हणता येत नाही. जसा जातिवाचक शब्द उच्चारता येत नाही; तसाच हाही दंडनीय अपराध ठरतो. जगात स्थितीवाचक दूषण देता येत नाही. उपचारक्षम, विशेष सक्षम, असे सकारात्मक शब्द रूढ होत आहेत. त्यामागे एक तर्क आहे, कोणताही माणूस दुर्लक्षित, उपेक्षित राहता कामा नये. कुणासही एक अंगुल नीच नाही ठरवता येणार. जो जसा आहे तसा त्याला स्वीकारून त्याला अधिक सक्षम, सभ्य, प्रतिष्ठित करणं, त्यासाठी संधी, उपचार, सुविधा देणं हे आता प्रगल्भ समाजाचे कार्य आहे, असं समजलं जातं.
 अजित, मुन्नी, भारती, मंजुषा, रवींद्र अशा कितीतरी मुलामुलींना आम्ही नॉर्मल केलं, ते औषधोपचारांनी नव्हे, तर त्यांचं सामाजीकरण करून, त्यांना भिन्नमती विकास शाळेत घालून. आता अनुभवांती मी या निष्कर्षाला आलोय की मतिमंद असणं ही उपजत गोष्ट असते. संयमानं त्यांना सावरता, सांभाळता येतं. ती शहाणीसुरती होतात. पण, शहाणीसुरती माणसं वेड्यासारखी वागतात ही माझ्यापुढची खरी सामाजिक समस्या आहे. कारण, वेडं करणाऱ्या शहाण्या माणसांची संख्या, जागतिकीकरणात वाढते आहे. मनोविकार, मनोविकृती वाढत जाऊन समाज खुळ्यांची चावडी होतो आहे, हे अधिक चिंताजनक आहे.

•••

निराळं जग निराळी माणसं/२६