पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जीवन मुक्तीकडे डायव्हर्ट होतात ही वस्तुस्थिती आहे...कोकण रेल्वेला एकदा अपघात झाला...वर्दी पोलीस, रेल्वे पोलीस, जिल्हा प्रशासनाला गेली तशी जीवन मुक्तीलाही! जीवन मुक्तीचे स्वयंसेवक पोलिसांपूर्वी हजर...तेही चार तासांचा प्रवास करून...आता कोकण रेल्वे अगोदर जीवन मुक्तीला फोन करते मग रेल्वेला! घाटात अपघात होतो...एस.टी. दरीत कोसळलेली असते...दरीतून मदतीसाठी टाहो फुटलेला असतो...पोलीस येतात...अग्निशामक दल येतं...चर्चा...नियोजन, फोनाफोनी सुरू असते... मागून जीवन मुक्तीचे स्वयंसेवक येतात...चर्चा करत न बसता दरीत दोर सोडतात...बॅटरीच्या झोतात ज्यांना दिसेल त्याना उचलतात...मग नाही म्हणायला पोलीस, अग्निशामक जवान...जोर लगाऽऽ के हैयाऽऽ करतात ...नदीला पूर येतो... माणसं घरात, छपरावर...झाडावर अडकलेली असतात...जीवन मुक्तीच्या सैनिकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात...शासन साधनं (होड्या, लाईफ, जॅकेट्स, दोर इ.) पुरवतं....प्राण संकटात घालतात ते जीवन मुक्तीचे स्वयंसेवकच! धरणग्रस्त शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी बेमुदत ठिय्या मांडतात... दिवसा मागून दिवस जातात...शिधा संपतो...संघटना हतबल होते...जीवन मुक्ती लगेच अन्नछत्र सुरू करते...! पोलीस भरती, सैन्य भरती असते. अक्षरशः शेकडो बेरोजगार तरुण भाकरी बांधून भरतीसाठी येतात... दिवसाच्या तयारीने परतीच्या तिकिटाचे निव्वळ पैसे, खुर्दा घेऊन आलेले तरुण...रोज एक एक दिवस वाढत जातो...आज नोंदणी, उद्या फिजिकल, परवा मेडिकल करत त्यांचे अवसान आणि भांडवल दोन्ही संपलेलं असतं...जीवन मुक्ती तिथं उभी राहते....चहा, नाश्ता, भोजन, वजन कमी पडलेल्यांसाठी केळी (केळी खा...क्षणात वजन वाढवा!) काही मागा...देतो खरं सैन्यात, पोलिसात भरती व्हा! अशोकच्या डोक्यात त्यातून एक भन्नाट कल्पना उभारली. व्हाईट आर्मी! डोक्यावर पांढरी कॅप (काऊंटी) पांढरा टी शर्ट, ब्राऊन कॅमफ्लाज पँट...असा जथ्थ्या दिसला की, समजायचं व्हाईट आर्मी...शांतता, अहिंसा, शिस्त, समर्पण, निरपेक्ष, साहाय्य, सद्भाव, निधर्मियता...सारं घेऊन माणूस कल्याणाचे काम करण्यात आता मुलीही येऊन स्वतः दाखल होतात...कस्तुरबा अंध वसतिगृह, वृद्धाश्रम, बालकल्याण संकुल, हेल्पर्स, चेतना कोणाही वंचितांचं काम असो, जीवन मुक्ती तत्पर.
 जगातलं सारं दु:ख प्यायला निघालेला हा अगस्ती! ही प्यास त्याच्यात कशी जागली, याचा शोध घेताना लक्षात आलं की, अरे हा तर आपलाच...आमच्यापैकी... आपल्यापैकीच...समाजासाठी तुमचं काही देणंघेणं लागायचं असेल, तर त्याची एक शर्त असते...तुमच्यात सामान्यापेक्षा

निराळं जग निराळी माणसं/१३५