पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्या शवागारात प्रेतं असतात बेवारसांची तशीच आत्महत्या, विषप्राशन, अपघात होणाऱ्यांची...व्हिसेरा राखून ठेवलेल्यांची...ज्यांचे शवविच्छेदन, पोस्टमार्टम करायचंय त्या सर्वांची...शवविच्छेदन पाहिलंय? ते करणारा पूर्ण शुद्धीत कधीच ते करू शकत नाही...तो आधी दोन घोट घेतो...मगच त्याला ते शक्य होतं... त्याला दारूबंदी माफ असावी!
 अशी जी बेवारस, प्रेतं असतात ती बंद किंवा उघड्या ढकलगाडीतून स्मशानात नेली जातात. धर्म माहीत असेल, तर कब्रस्तानातही! असंच एक बेवारशी प्रेत एकदा कोल्हापूरच्या स्मशानभूमीकडे ढकलत नेण्यात येत होतं... ते पोस्टमार्टम झालेलं होतं. वाटेत ते पडत पडत उरलेले अवयव स्मशानात पोहोचले. त्याचे दहन झालं. मनुष्य देहाची ही सर्रास होणारी विटंबना ६ लाख लोकवस्तीत कोल्हापुरात फक्त अशोकच्या हृदयाला भिडली...त्यानं यंत्रणेशी प्रतिवाद केला...भांडण काढलं...त्याची बातमी झाली...अन् अशोकने आपल्या नावाप्रमाणे हे जग शोकमुक्त करण्याचा विडा उचलला...पहिल्यांदा स्वतः केलं...मग हात मदतीला आले. मला आठवतं, आम्ही जीवन मुक्तीचे स्वयंसेवक हे काम पहिल्यांदा करत होतो तेव्हा आमच्याकडे संवेदनशील मनाशिवाय काही नव्हतं...होतं फक्त माणुसकीचं नातं...जगणं नाही सन्मानाचं करता येतं, तर मरणापासून तरी सुरुवात करू...जीवन मुक्त झालेल्या सन्मानाचं मरण देण्याच्या ध्यासातून जीवन मुक्ती संस्था उदयाला आली...मला आठवतं सुरुवातीच्या दिवसात जीवन मुक्तीकडे कफन (मरणवस्त्र) विकत घेण्याची पण ऐपत नव्हती...वर्दी आली की कुणी तरी घरातलं धडुतं (जुनी साडी, चादर, बेडशिट, कापड) घेऊन यायचं...कोण निलगिरीची बाटली घेऊन यायचा...दुर्गंधीवरचा तो आमचा उतारा होता...इत्र नहीं मूत्र सही...पूर्वी गोमूत्र शिंपडायचे...नंतर अत्तर आलं...अत्तर रोज कसं परवडणार? निलगिरी दुर्गंध नि रोगप्रतिबंधकही! मग आम्हाला दाता मिळाला...कफन देणारा... मग हँडग्लोव्हज् आले...मग स्ट्रेचर...गणवेश. आता तर स्मशानात बेवारस प्रेताला सन्मानाने सलामी देऊन अलविदा केलं जातं...इतर घरातली माणसं हा शाही समारंभ पाहतात तेव्हा त्यांना त्यांच्या वारसदार खानदानीपणाची आतल्या आतल्या टोचणी लागून जाते खरी...!
 या कामानं सुरू झालेलं जीवन मुक्ती संस्थेचे कार्य. आज ती संस्था काय करत नाही. हे शोधावं लागेल...केव्हाही, कशासाठीही, कुठेही बोलवा...जीवन मुक्ती तुम्हाला मुक्ती देते...कोल्हापुरात काहीही घडलं (अर्थात विपरीत)...मदत लागणारं...पहिला फोन ना पोलीस कंट्रोलला जातो ना अग्निशामक केंद्राला अन कधी कधी तर पोलिस कंट्रोल रुम, अग्निशामक दल, होमगार्डचे फोनही

निराळं जग निराळी माणसं/१३४