पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही कमी असावं लागतं...उण्यातून बेरीज सुरू होते (बेरजेचं समाजकारण सोपं नसतं...राजकारणासारखे) अशोकचे वडील मूळ कर्नाटकातले. गरीब...निराधार. ते तिथल्या सर्टिफाइड स्कूलमध्ये वाढले...शिकले. शिकले म्हणजे शाळा नव्हे... शिवणकला! अठरावं लागलं...मोठे झाले...समाजशाळेत स्वत:च्या पायावर टाके घालत उभे राहिले...दर्जी काम करत कोल्हापुरात आले... टाके घालत टाकीचे घाव सोसत आज त्यांच्या हाताखाली २५ निराधार मुलं साधार होत आहेत ...आख्ख्या कोल्हापूरची मुलं जे गणवेश घालतात ते अशोकच्या बाबांच्या युनिफॉर्म कारखान्यात (शिवणशाळेत) तयार होतात. अशोकच्या बाबांची गोड तक्रार आहे...मी मिळवतो आणि हा उडवतो...घालवतो! म्हणून त्यांनी अशोकला स्वतंत्र धंदा काढून दिला...त्याची व्हाईट आर्मी बंद व्हावी म्हणून! मग त्यानं बापच बदलला...मला बाबा म्हणायला लागला! आता त्याचं बरं चाललंय...रोज नवी स्वप्नं पाहायचा त्याचा उद्योग तेजीत आहे. त्याला आता हवी आहे जागा...मैदान, बरॅक, आपली व्यवस्थापन साधनं-प्रशिक्षण केंद्र...सारं त्याला करायचं आहे...रोज एक एक दोन जोडत निघालेला अशोक रोकडे, त्याची जीवन मुक्ती संस्था, स्वयंसेवक, पोलीस, जिल्हा प्रशासन, समाज, देणगीदार सर्वांचा गोफ विणत समाजाची नवी शिवण तो शिवतो आहे...समाज, उसवू नये म्हणून...उद्ध्वस्त होऊ नये म्हणून...उतू नये, मातू नये म्हणून! प्रश्न आहे तो तुम्ही काय करणार आहात यात भागीदारी, दु:खात भागीदार, भागीरथ होता येतं तो माणूस!

•••

निराळं जग निराळी माणसं/१३६