पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मी तुम्हाला अनुभवाने सांगेन की, सुदृढ पुरुषानं भारतात अपंग मुलीशी लग्न केल्याचा इतिहास नाही. सुदृढ स्त्रियांनी अपंग पुरुषाशी लग्नाची उदाहरणं अनेक आहेत. आपला समाज पुरुषसत्ताक असतो. याचं हे ढळढळीत उदाहरण! अपंग मुलीशी लग्न...अपत्य होणार नाही. लैंगिक सुख लाभणार नाही. घरची (मुलीच्या) इस्टेट नाही...असेलच तर गोड गळा नि ३६ गुण...एवढंसं संचित 'जीवन' मानणारे पी.डी...हे येरागबाळ्याचे काम नाही. 'जिथे देवदूत जायला घाबरतात तिथे केवळ मूर्खच प्रवेश करू शकतात.' अशा आशयाचं एक इंग्रजी वाक्य आहे, त्यातल्या 'मूर्ख' शब्द पारंपरिक अर्थाने घेता येणार नाही... जांबाज माणसंच वाघाच्या जबड्यात हात घालतात...मी पी.डीं.ना एकदा याबद्दल छेडलं होतं... तेव्हा ते म्हटले होते की, 'प्लॅटॉनिक लव्ह' बद्दल मी वाचलं तेव्हा वाटलं की, कविकल्पना जगता आली पाहिजे म्हणून मी रजनीशी लग्न केलं... माझं तिचं प्रेम Romantic नव्हतं... ते एक 'Realistic life' होतं नि आहे... कल्पना नि जीवनातील जमीन अस्मानी अंतर पार करणारे पी.डी. व रजनीताई आपणापेक्षा अनेक अर्थाने निराळे!
 या दोघांनी हातात हात घालून अपंगांची स्वर्गनगरी उभारली आहे सिंधुदुर्गात. १२ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात १०० लाभार्थी अपंगांचे पुनर्वसन केंद्र म्हणजे स्वप्ननगरी! कोल्हापुरात तसंच आणखी १०० मुलांचं वसतिगृह. ५०० मुलांची शाळा. नावच त्यांचं समर्थ विद्यालय. शिवाय अपंग सुविधा निर्मित केंद्र. तिथं कुबड्या, जयपूर फूट, फर्निचर, वॉकर सर्व तयार होतं. शिवाय पतसंस्था, गॅस एजन्सीचा पसारा. दोन हात, पाय असलेले जे जे करतात (चांगलं) ते ते हात, पाय नसलेल्यांना अधू असलेल्यांना करता आलं पाहिजे, असा यांचा घाट. शेती, काजू केंद्र असेही उपक्रम! हे सारं दोघे अनुदानाशिवाय करतात! अनुदान संस्थांना नादान करतं, असं यांचं तत्त्वज्ञान! अपना हाथ (नसला तरी) जगन्नाथ होऊन जगायचा ध्यास!
 पी.डी. आणि रजनीताई हेल्पर्स संस्थेमार्फत अपंगांच्या शिक्षण, संगोपन, पुनर्वसनाचं काम विणकराच्या कौशल्याने करतात. विणकर धागा जोडतो; पण गाठ दिसू देत नाही. पी.डी. व रजनीताई साह्य करतात. पण साह्याच्या खुणा ठेवत नाहीत. हे त्यांचं अनुकरणीय वेगळेपण. कवी गुलजार, सुरेश भट यांचे पी.डी. फॅन आहेत. पी.डीं.नी गुलजारांच्या काही कवितांचे केलेले अनुवाद मी वाचलेत. वरील विणकामावरून आठवलं. पी.डीं.नी गुलजारांच्या कवितेच्या एका कडव्याचा अनुवाद असा होता-

निराळं जग निराळी माणसं/१२९