पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लहानपणी एकदा ते पडले नि त्यांच्या जिभेचा शेंडा तुटला. त्यामुळे त्यांना आपल्यासारखं शेंडा असलेले लोक जिव्हारी बोलतात तसं बोलताच येत नाही! त्यामुळे अजातशत्रू! वामनमूर्ती पी.डी. मला कायम सुदृढ बाळाप्रमाणे निरागस दिसत आलेत आणि वागणंही तसंच निष्पाप, पी.डी.ना मी पहिल्यांदा पाहिलं नि मी त्यांच्या प्रेमात पडलो. कोल्हापुरात रेडिओस्टार गायिका आहेत. रजनी करकरे...महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रावरून एक भक्तिगीत प्रसृत होत असतं...
 मागते देवा, ते मज दे |

 मला हवे ते,

 तुझ्याच जवळी,

 दान मला मागू दे ||
 ते मी ऐकलं नि रजनीताईंच्या प्रेमात पडलो होतो. हे दोघे पती-पत्नी आहेत, हे कळल्यावर मी तिसऱ्यांदा यांच्या प्रेमात पडलो. अजून त्यातून सुटका नाही! पी.डी. सुशिक्षित, नॅशनलाइज बँकेत मॅनेजरची भक्कम पगाराची पक्की नोकरी. घरंदाज खानदान. पूर्वज जमीनदार, घरचे सगळे समृद्ध, पी.डीं. नी मनात आणलं असतं तर कमावती, कामिनी कुलवधू ते मिळवू शकले असते; पण त्यांनी रजनी करकरे या अपंग गायिकेशी लग्न केलं. त्यांचं लग्न, सुखी संसार हीच मुळी एका निराळ्या जगाची नांदी होती. यात आपण काही भव्य-दिव्य, आदर्श करतो, असा पी.डीं. चा आविर्भात नव्हता की विचार. विचारच म्हणाल तर अपंगांबद्दलची सर्वत्र असणारी दया, सहानुभूती यांना छेद देणारी एक सहवेदना व संवेदना होती. या माणसानं लग्नाचा मुहूर्त निवडला तो स्वातंत्र्यदिन १९८४! स्वातंत्र्यदिन निवडायचंही कारण होतं. रजनीताईंचा जन्म १९४३ चा. १५ ऑगस्ट, १९४७ ला त्यांना पोलिओचा अटॅक आला. देश स्वतंत्र झाला; पण रजनीताई परतंत्र, पराधीन! पी.डीं.नी त्या दिवशी सप्तपदी घातली नि त्यांना स्वतंत्र, स्वावलंबी केलं! काही मित्र पी.डी.ना गमतीनं म्हणतात... "देशाचा स्वातंत्र्यदिन; पण तुमचा मात्र पारतंत्र्यदिन..." ती एक मध्यमवर्गीय जिव्हारी कुचेष्टा असते. ज्यांना आपल्या पावलापलीकडचं जग नसतं ते दुसऱ्यासाठी एक पाऊलही उचलत नसतात. अपंगांसाठी सात पावलं...सात योजनं दूर चालल्याचा पी.डीं.चा प्रवास थक्क करणारा. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला नि वर्षांनी अमलात आणला. कारण ती एक विचारपूर्वक कृती होती.

निराळं जग निराळी माणसं/१२८