पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला ही तुझी युक्ती शिकव ना रे विणकरा

 वस्त्र विणताना धागा मधे संपला किंवा तुटला

 तर तू तो जोडून घेतोस.

 तुझे हे जोडकाम इतके बेमालूम

 की त्यातली न गाठ दिसते, न जोड

 मी एकदाच असे एक नाते विणायला घेतले होते,

 पण त्यातले सर्व जोड, गाठी,

 सगळ्यांना स्पष्ट दिसले रे विणकरा!
 पी.डी.च्या समाजसेवेची वीण पाहूनच गुलजारांना या ओळी सुचल्या असाव्यात. इतकं या ओळीचं नि पी.डीं.च्या वागण्यात साम्य! पी.डी. कविमनाचा कलंदर कलाकार. त्याचं एक उदाहरण सांगतो. लग्न झाल्यावर सर्व जण बायकोला बंधनात ठेवण्यासाठी अंगठी घालतात. पी.डीं. नी लग्न झाल्याची खूण म्हणून बायकोस सुर्वेंचा 'सनद' काव्यसंग्रह भेट देऊन रजनीस आपल्या जीवनाची दिशाच समजावली. लग्नाला त्यांनी रजा काढली नाही. निमंत्रित नाहीत. होमहवन नाही, आपण दोघं हातात हात घालून जीवन असेल तिथपर्यंत चालत राहू, असं ठरवलं नि चालत राहिले. रजनीताईंना कुबड्या घेतल्याशिवाय एक पाऊल पुढे टाकता येत नाही. रिक्षात बसणं अडचणीचं म्हणून पी.डीं.नी मारुती ओमनी घेतली. सारथ्य करणं, रजनीच्या कुबड्या सांभाळणं, रजनीला चहा देणं, तिला कमी हालचालींत तिचं तिला मिळावं, करता यावं, अशी सारी योजना करणारे पी.डी. पाहिले की आठवतात काही ओळी...त्यात शब्द बदलून म्हणावं वाटतं, 'घायल की गति कायल जाने!' मूळ ओळ आहे...घायल की गति घायल जाने...पी.डी. अपंग नसले, तरी अपंगांच्या वेदना, व्यथांचा परकाया प्रवेश करणारा हा कायल (योग्य) माणूस! समाजसेवेच्या क्षेत्रात दोन प्रकारची माणसं असतात. एक कायम प्रसिद्धीच्या झोतात राहणारी, तर काही कायम भूमिगत. पी.डी. कायम भूमिगत...लाजाळूचं रोप...फूल...रजनीताईचं नि पी.डीं.चं अद्वैत जीवन इतकं की श्वानसंवेदी! कुत्र्याला धनी येणार ते आधीच उमगतं... रजनीताईंनाही पी.डी. येणार हे आधीच कळतं. हे कसं म्हणून विचारलं तर त्या म्हणाल्या, "मी आणि पी.डी. एकच असल्यामुळे मला ते कळतं. तुम्हाला का कळत नाही?... अंतर्मुख व्हा!"

निराळं जग निराळी माणसं/१३०