पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/12

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तेथील माणसाचं जिणं माणूसपणाचं व्हावं म्हणून कधी कुठल्या नगरपालिकेस, महानगरपालिकेस वाटलं नाही. सरकारच्या दफ्तरी वेश्यांची माणूस म्हणून नोंद झालीच कुठे आहे? वेड्यांना ते काय करतात हे कळत नसल्यानं त्याचं सारं हवं, नको पहायची जबाबदारी तिथल्या डॉक्टर, कर्मचारी, सेवकांची. पण तिथली व्यवस्था, वागणूक पाहिली की सतत वाटत रहातं... इथे सुधारणेस भरपूर वाव आहे. अंधानी शिकावं म्हणणाऱ्या शिक्षण व्यवस्थेला सर्व इयत्तांची, सर्व विषयांची पुस्तकं ब्रेल लिपीत काढायचा डोळसपणा स्वातंत्र्याच्या ७० वर्षाच्या प्रवासात दाखवता आला नाही, ही वस्तुस्थिती आहे. स्त्रियांचं सबलीकरण सवलतींपेक्षा त्यांना स्वयंप्रेरिका बनवून लवकर होतं हे यातील ‘स्वयंसिद्धा' संस्थेवरील लेखातून समजेल. तसेच मॅगसेसे पुरस्कार मिळालेल्या नीलिमा मिश्रांच्या बहादरपूर (जळगाव) च्या भगिनी निवेदिता ग्रामीण विज्ञान निकेतन संस्थेच्या कार्याचा अभ्यास केला तरी कळेल. दान, अनुदान, सवलत, कर्जमाफीने आपण समाजास निष्क्रिय करतो हे ज्या दिवशी शासनास उमजेल तो मनुष्य विकासाचा सुवर्ण दिन! हीच गोष्ट अपंगांचं कार्य करणाऱ्या 'हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड'च्या नसीमा हुरजूक, रजनी करकरे, पी. डी. देशपांडे प्रभृतींची. त्यांची शौर्यगाथा वाचताना तुम्हाला तुमच्या अकर्मण्यतेची जाणीवही होईल. बालकाश्रम, रिमांड होमसारख्या संस्था ‘समाज हृदय' बनतील तेव्हा आपल्या नैतिकता, सदाचार, संस्कृतीविषयक भ्रामक कल्पना गळून पडायला मदत होईल. साधा तुरुंग घ्या ना! तिथं जी माणुसकी, आपलेपणा मी पाहतो ते समाजात नाही दिसत प्रकर्षाने. हा लेखन प्रपंच तुम्हाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यासाठी खचितच नाही. पण ते तुम्हास खचितच अंतर्मुख करेल व भावसाक्षरही! ‘निराळं जग, निराळी माणसं' मधील वरील संस्थांचं कार्य, कर्तृत्व घरंदाज घरांना लाजवेल असं असल्यानं ही समाजघरं मला नेहमीच माणुसकी व मानवतेची खरी ऊर्जा केंद्रे वाटत आली आहेत.
 अशा संस्थांचं आयुष्यभर कार्य करणारे सेवाव्रती, त्यांची चरित्रं वाचली की आपण किती स्वार्थी व अप्पलपोटी आयुष्य जगतो हे जाणवतं. इंदिराबाई हळबे यांनी जात, पात, धर्माचा विचार न करता आडवस्तीत अडलेल्या सर्व मातांना प्रसूतीच्या वेळी हात दिला. कुमुदताई रेगेंनी स्वत: अविवाहित राहून आयुष्यभर गांधीवादी मूल्यांची पाठ राखण करत कोकणासारख्या दुर्गम भागात विधवा, परित्यक्त स्त्रिया व त्यांच्या मुलांचा सांभाळ केला. संस्थेतील सर्व वंचितांचं खाणं, पिणं, शिक्षण व्हावं म्हणून पोल्ट्री चालवणं, गिरणी काढणं, शेत कसणं, हे सारं त्यांनी केलेलं पाहिलं की वाटतं ही माणसं खरी समाज पोशिंदी! दादा ताटके स्वत:च्या उपजीविकेसाठी नोकरी करतात व नोकरी