पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/11

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ... मला समाजाच्या तथाकथित नैतिक कल्पनेपोटी अनौरस मानून टाकलं होतं कचरा कोंडाळ्यात. अनाथाश्रमाने मला कडेवर घेतलं, छातीला कवटाळलं अन् मी इतका मोठा झालो की महाराष्ट्रातल्या साऱ्या अनाथाश्रमांचाच अध्यक्ष झालो. असं तुमच्या घरी ज्याला तुम्ही संस्कार घर समजून, अनाथाश्रम रिमांडहोमची हेटाळणी करता, तिथं कधी घडलंय?
 ...घरी मुलानं दंगा केला की तुम्ही त्याला भीती घालता...'रिमांड होममध्ये ठेवू तुला?' त्याच रिमांड होमची मुलं-मुली डॉक्टर, नर्स, इंजिनिअर, सेनाधिकारी, साहित्यिक, शिक्षक, प्राध्यापक, नगराध्यक्ष होतात. हे किती जणांना माहीत आहे? रिमांड होम तुरुंगात चोरी कधीच होत नाही. चोरी फक्त सज्जन माणसांच्या समाजातच होते.
 ... असं जगावेगळं निराळं जग मी जन्मापासूनच पाहात आलो होतो. या निराळ्या जगाविषयी लिहायचं बरेच दिवस डोक्यात होतं. शिवाय हे निराळे जग असतं दुःखालय, करुणालय! तिथलं दु:ख, दैन्य सरावं म्हणून अगस्ती ऋषीसारखं आयुष्य पणाला लावून या निराळ्या जगातल्या प्रत्येक वंचित, दुःखिताचं शल्य सरावं म्हणून प्रयत्नांची पराकाष्ठा करणारे भागिरथी नि भगीरथही मी पाहात आलोय. अशांना वर्तमानपत्रात एका कॉलमात बंदिस्त करणारा मध्यम व माध्यम समाजही मी पहात आलो होतो. हा सर्व पिंगा डोक्यात थैमान घालत असताना एकदा दैनिक 'प्रहार' चे फीचर एडिटर राम जगताप भेटले. गप्पांच्या ओघात 'निराळं जग, निराळी माणसं' याविषयी बराच वेळ बोलत राहिलो. उठताना ते सहज म्हणाले की, "हे सर्व तुम्ही लिहीत का नाही?" मी म्हटलं, "कोण छापणार?" म्हणाले, "अरे 'प्रहार' छापेल. त्यासाठी तर तो पेपर आहे...प्रहार करण्यासाठी...जे जे विघातक आहे त्यावर हल्लाबोल करण्यासाठी तर आम्ही आहोत!" मी मग प्रवेशाचा एक लेख...इंट्रो पाठवला. त्यांनी सदरच जाहीर करून टाकलं...'निराळं जग.' त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी वर्षभर काही ते चालवू शकलो नाही. कॉलेजचं प्राचार्यपद अन् हे स्तंभलेखन तारेवरची कसरत होत राहिली अन् मी ते सहा महिन्यांतच बंद केलं. पण डोक्यात उर्वरित लेखनाचा किडा वळवळत राहिला होता. निवृत्त होताच तो उसळून, उफाळून उडू लागला. या साऱ्यांची गोळाबेरीज म्हणजे हे पुस्तक ‘निराळं जग, निराळी माणसं.' यात जग, जीवन, माणसं सारं आहे. पण प्रामुख्यानं आहे वंचितांचे संगोपन, संरक्षण, संस्कार, शिक्षण, प्रशिक्षण, उपचार करणाच्या संस्था व तेथील सेवाव्रती कार्यकर्ते!
 वेश्यावस्तीतही माणसंच राहतात. कुणाला हौस असते आपली अब्रू वेशीवर टांगण्याची? पण काही स्त्रियांच्या जीवनात तो नरक येतो. तो आयुष्यभर पिच्छा पुरवत रहातो. या उपेक्षित, वंचित वस्ती विकासाची व