पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/13

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यतिरिक्त सारा वेळ माटुंग्याच्या श्रद्धानंद महिलाश्रमास देऊन ती संस्था 'घर' करतात. आज घरं अनाथाश्रम होत असल्याच्या काळात मला हे अधिक महत्त्वाचं वाटतं. आंतरराष्ट्रीय समाजशास्त्रज्ञ डॉ. शरच्चंद्र गोखले म्हणजे साऱ्या जगाची चिंता लागून राहिलेले अस्वस्थ अश्वत्थामाच! वेश्यांची मुलं हृदयाशी लावणाऱ्या विजयाताई लवाटे असो वा वेश्यांचं शल्य सांभाळणारे अहमदनगरचे आमचे मित्र डॉ. गिरीश कुलकर्णी असो, साऱ्यांत मला दुसऱ्यांसाठी वाहणारा अखंड पाझरच दिसला. रमाकांत तांबोळी म्हणजे क्षणोक्षणी समाजध्यासी गृहस्थ! अजीजभाई भयाणींना मी माझ्या कळत्या ५० वर्षांत एक शब्द न बोलता काम करतानाच पाहिलं! कुठून येतो हा संयम, सद्भाव, सभ्यता? अनुराधा भोसले प्रत्येक समाजातील दगड प्रश्नांवर डोकं आपटणारी फुलनदेवी कशी होते? काय रसायनाने तयार झालेत इव्हान लोमेक्स, शिवाजी पाटोळे, पवन खेबूडकर, अशोक रोकडे, संजय हळदीकर? मंगला शहांना का पडावा एड्सग्रस्त मुलांचा घोर! हे सारे अस्वस्थ प्रश्न या लेखनाचे खरे प्रेरणास्त्रोत होत. ही माणसं जागी आहेत म्हणून समाज निवांत झोपू शकतो. अशी कल्पना करून पहा ना... या संस्था नि हे सेवाव्रती नसते तर समाज कसा बीभत्स, ओंगळ झाला असता. समाजस्वास्थ्य डी. डी. टी. फवारून निर्माण होत नसतं. माणुसकीची फुंकर जे काम करते ते आयोडिन नाही करू शकत. 'निराळं जग, निराळी माणसं' समाज वंचनेचे हरण करणारं लेखन होय. ते माझ्या आयुष्यभराचं अस्वस्थपण होतं. या लेखनाने मी थोडा हलका झालो. समाजही तो वाचून हलेल तर वंचितांच्या व्यथा, वेदना हलक्या होतील.
 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, वेश्या, कुमारीमाता, देवदासी, परित्यक्ता, बलात्कारित भगिनी, वृद्ध, अपंग, अंध, मतिमंद, मनोरुग्ण, तृतीयपंथी, आपादग्रस्त, बंदी, इ. साऱ्यांनी बनलेलं वंचितांचं विश्व म्हणजे समाजातलं तिसरं जगच. एक तुमचं गावकुसातलं, दुसरं गावकुसाबाहेरचं दलितांचं अन् हे तिसरं जग वंचित, उपेक्षितांचं. माणूस असून समाजलेखी माणूस म्हणूनही न नोंदलेलं हे जग आपोआप नाही निर्माण झालं. तुम्हीच त्याचे कर्ते - करविते. म्हणून खरं तर त्यास जबाबदार तुम्हीच व ती तुमचीच जबाबदारी. ती तुम्ही पार नाही पाडत म्हणून संस्था जन्मतात नि उभारतात हिमती, हिकमती समाज कार्यकर्ते! मी या साऱ्या संस्था, कार्यकर्त्यांसह काही लुडबुड करत असताना त्याचं मला जे आकलन झालं ते तुमच्यापर्यंत पोहोचवावं म्हणून मी 'निराळे जग, निराळी माणसं' लिहिलं. या साऱ्या संस्था व कार्यकर्त्यांसह सह माझं जीवन अधिक संवेदी व समाजबांधील झालं. आजही मी या विश्वाशी नाळ तोडू शकलो नाही, कारण या नाळेतलं रक्त अजून सुकलेलं नाही.

डॉ. सुनीलकुमार लवटे