पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

भारतातील या पहिल्या निराधार एच.आय.व्ही. ग्रस्त बालकांसाठीच्या निवासी पुनर्वसन केंद्रात आज शेकडो मुले आपल्या उरलेल्या आयुष्यातील आनंदाचे कण कण साठवून घेताहेत. गिरीश कुलकर्णी म्हणतात, "त्यांना आयुष्य देणं आपल्या हातात नाही; पण त्यांना माणसासारखं मरण तरी मिळवून द्यायला हवं. आजही संस्थेत पाऊल ठेवलं की, ही मुलं आनंदानं गिरीशच्या अंगाखांद्यावर नाचत असतात. हे ज्यांनी पाहिलं त्यांना गिरीशच्या नसानसांत भरलेलं संवेदनेचं वारू लक्षात आल्यावाचून राहात नाही.
 स्नेहांकुर नावाने सुरू केलेल्या अनाथ मुलांच्या पुनर्वसन केंद्रातही हीच गत आहे. पोरं इथे खरंच 'अनाथ' वाटतच नाहीत. मागच्याच आठवड्यात त्यातील दोन पोरांना, त्यांच्या बायांना घेऊन, पुण्यातील नामवंत डॉक्टरांना दाखविण्यासाठी गिरीश कुलकर्णी स्वतः येऊन गेले. येथील तज्ज्ञांचे मत घेतल्यावर, सर्टिफिकेट घेतल्यावरच निर्धास्तपणे ते मूल वाढवणे आणि योग्य त्या दत्तक-पालकांच्या हाती सोपवणे जास्त महत्त्वाचे. इतकी काळजी अजूनही ते स्वतः घेतात. या कार्यात त्यांची पत्नी प्राजक्तासुद्धा तेवढ्याच ताकदीने उभी आहे. त्या दोघांचं स्वत:चं बाळ- त्याची मुलगी स्नेहांकुरमध्ये रमते, खेळते, लाड करून घेत असते.
 कुठलेही रचनात्मक काम संघर्षाची जोड दिल्याशिवाय टिकत नाही. तसेच ते व्यापक सामाजिक प्रभाव पाडू शकत नाही. स्नेहालयाने रचनेला संघर्षाची जोड आरंभापासूनच दिली आहे. वर्ष २००६ मध्ये नगरमध्ये उघडकीस आलेले व राज्यभर गाजलेल्या अल्पवयीन मुलींच्या वासनाकांड प्रकरणाचा निकाल २० सप्टेंबर २०१० रोजी लागला. अहमदनगरच्या सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देताना २० आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नगर, धुळे व जळगाव जिल्ह्यातील राजकारणी, पोलीस, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक अशा नामवंतांचा समावेश आहे. अल्पवयीन मुलींच्या वासनाकांडाचे हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी, अनिल गावडे, चाईल्ड लाईनचे मिलिंद कुलकर्णी, हनिफ शेख, अंबादास चव्हाण आदी कार्यकर्त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. याची दखल सर्व वृत्तपत्रांनीही घेतली. कुठल्याही पक्षाच्या दबावाला बळी न पडता, न्यायासाठी नेटाने लढणाऱ्या या व्यक्तीला व त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन कार्य करतच राहणाऱ्या त्यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना मनापासून प्रणाम आणि खूप खूप सदिच्छा देऊ यात. वाळू तस्करी प्रकरणात तर एक वेळ अशी आली, अत्याचारित आई आणि मुलीनेच गिरीशला सांगावा धाडला, भाऊ आमच्यापायी नका अडचणीत येऊ, आमच्यापेक्षा तुमची गरज इथे जास्त आहे, सांभाळून राहा!

निराळं जग निराळी माणसं/११४