पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 गिरीश कुलकर्णी यांचं वेश्या पुनर्वसन, एच.आय.व्ही.बाधित बालकांचे संगोपन, अनौरस बालकांचे दत्तकविधानाद्वारे समाजीकरण अशी बहुविध कामं म्हणजे एका सामाजिक प्रश्नांच्या सोडवणुकीचे अष्टदिशी उपाय होत. वेश्यांना एड्स होऊ नये म्हणून निरोधचा प्रचार करणं, वेश्या वस्तीतून त्यांची मुलं बाहेर काढणं, ज्यांना बाहेर काढणं शक्य नसतं त्यांना तिथंच पर्यायी सेवा पुरवणं..."तुम्ही हरू नका... आम्ही आहोत" म्हणत हिंमतनगर उभारणं या साच्यासाठी मुळात तुमच्या मनात एक स्वप्न असावं लागतं नि ते सत्यात उतरवण्याची रात्रंदिवस तळमळ असावी लागते...मग समाज तुमचा पाठीराखा होतो. गिरीशनी हे कामं सुरू केलं तेव्हा लोक पैसे द्यायचे; पण संस्थेचे सभासद नाही व्हायचे...परिणामी त्यांची संस्था पोरापोरांची होऊन गेली. कामं गंभीर होत राहायचं, पण कुणी गांभीर्यानं घ्यायचं नाही. मग गिरीशच्या हाकेला ओ देत हिरवे बाजारचे पोपटराव पोवार आले, राळेगण सिद्धीचे अण्णा हजारे आले. सिनेनट सदाशिव अमरापूरकर...आणि परवा 'सत्यमेव जयते'तून आमीर खानही. मग त्यांच्या धडपडीला बळ आलं. पुढे त्याच्या कामातून उभारलेल्या पुनर्वसित वेश्यांनी अनेक सामाजिक कामांना बळ दिलं. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शनि शिंगणापूरला महिलांना प्रवेश द्यावा म्हणून जे आंदोलन केलं त्यात स्नेहालयाच्या भगिनी सहभागी झाल्या होत्या.
 गिरीशला हे कार्य करताना जे यश लाभलं त्याचं एक रहस्य आहे. तो मनात आणलं की कृतीत उतरवतो. 'आजचे आत्ताच' या तत्त्वामुळे तो कामाचा डोंगर उभारू शकला. आजवर त्यानं ३००० वेश्यांच्या मुला-मुलींना सन्मान्य नागरिक बनवलं, याचा नुसता ताळेबंद घेतला तरी आपल्या लक्षात येईल की, अर्जुनाच्या केवळ माश्याच्या डोळ्यांच्या वेधाच्या एकाग्रतेमुळेच अशक्य ते शक्य झाले होते.
 जे काम केलं त्याचं समाधान जरी गिरीश कुलकर्णीना असलं तरी या कामातील उणिवा, त्रुटींनी तो सतत अस्वस्थ असतो. भारत सरकार काय नि महाराष्ट्र काय...एड्सबाधितांच्या संगोपन, पुनर्वसनासाठी साहाय्य करतं...एड्समुक्त एड्स निगेटिव्हसाठी काही करत नाही...रोगग्रस्तांना साहाय्य, रोगमुक्तांना विजनवास हे गिरीशचं शल्य एका सामाजिक कार्यकर्त्यांची अस्वस्थता आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. अपघातग्रस्तांना मदत देण्यात शासन धन्यता मानते...अपघात होऊ नये यावर नाही पैसा खर्च करत...नवा निरोगी समाज बनायचा, तर प्रतिबंधात्मक समाज कार्याची वीण विस्तारायला हवी असं त्याला वाटतं.

निराळं जग निराळी माणसं/११५