पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जागेत संस्थेच्या पहिल्या वास्तूचे बांधकाम सुरू होतं. मंगल नावाची महिला देहविक्रयाचा धंदा करायची. अशा व्यवसायातल्या बायकांना प्रचंड वैफल्यानं ग्रासलेलं असतं. त्यातूनच त्या व्यसनांना जवळ करतात. अगोदरच पाशवी वासनांमुळे हेळसांडलेल्या देहाला अनेक रोग पोखरू लागतात. या मंगलला दारू-गुटख्याचं व्यसन होतं. त्यातच ती एच.आय.व्ही.ग्रस्त असल्याचे निष्पन्न झालं आणि वैफल्यग्रस्त, निराश अवस्थेतच तिला मूलही झालं. तेही एच.आय.व्ही.बाधितच निपजलं. सागर नाव ठेवलं होतं त्याचं त्याच्या मावशीनं! दारूच्या नशेत ती आई इवल्या मुलाला मारू लागली. कुपोषण आणि त्वचा विकारांनी ग्रासलेल्या त्या छोट्याला तो मार असह्य झाला. आई तर इतकी हिंसक झालेली की, तिने दगडच उचलला त्याला मारायला. मग मात्र इतर बायकांना बघवले नाही. दोघी-तिघींनी सारी शक्ती एकवटून मंगलला पकडलं आणि दोघींनी सागरचा ताबा घेतला. सागर एव्हाना बेशुद्ध होऊन निपचित पडला होता. वेळ रात्रीची दीडची! सागरला घेऊन या बायका अशा वेळी कुठे जाणार होत्या? त्यांना एकच आधार 'गिरीश भाऊ'. ते अर्धमेलं पोर त्यांनी भाऊंच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवलं. आपण किती मोठं आव्हान पेलायला चाललोय, याची जाणीव गिरीशला झाली. तेव्हा तर अशा मुलांच्या संगोपनासाठी कोणत्या सुविधादेखील तिथं नव्हत्या; पण जो विश्वास, जी आशा आणि ज्या आधाराची अपेक्षा डोळ्यांत घेऊन या साऱ्याजणी आल्या होत्या त्यांचं काय कारण हे पटकन सुचेना. ही अवस्था पाहून एकजण म्हणाली, "चला ग बायांनो, मरू द्या ते पोरगं..." आणि मग निर्धार पक्का झाला. २०-२१ वर्षे वयाच्या गिरीशने ते जखमांनी, त्वचारोगानं भरलेलं अर्धमेलं मूल हातात घेतलं. चपला पायात सरकवल्या आणि थेट सिव्हिल हॉस्पिटल गाठलं. उपचार सुरू झाले. तो वाचणार, असं डॉक्टरनं सांगितलं आणि त्या बायकांच्या डोक्यातील गिरीशबद्दलच्या विश्वासाचा, श्रद्धेचा भाव गिरीशच्या मनात कामाची उमेद वाढवून गेला.
 नगर एम.आय.डी.सी. च्या जागेत तेव्हा भूकंपविरोधक इमारतीचे बांधकाम सुरू केलं होतं. घुमटाकार छपराची ती इमारत अर्धवट अवस्थेतच होती. इस्पितळातून सागरला घेऊन बाहेर पडल्यानंतर सागरला थेट तेथेच आणलं. तिथे त्याची देखभाल होईल अशी सोय केली. बालसंगोपनाच्या संस्थेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. बांधकाम पूर्ण व्हायच्या आधीच त्या इमारतीचे उद्घाटन झालं होतं. एड्सबाधित बालकांच्या संगोपनाचा प्रकल्प असा सुरू झाला. सरकारी मदतीशिवाय केवळ सामाजिक सहयोगातून सुरू असलेल्या

निराळं जग निराळी माणसं/११३