पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जखम घेऊन गिरीश आज २२ वर्षं उलटली तरी अहमदनगरच्या चित्रा, भगत, नांगरे, ममते इ. गल्लीतील वेश्या वस्तीतील...तिथल्या आई, बहिणी...त्यांची मुलं....साऱ्यांच जीवन उन्नत व्हावं म्हणून पायाला चाकं लावून सारं नगर डोक्यावर घेता एका ध्यासपर्वाने उसासे सोडतोय...वेश्या अन् त्यांची मुलं...त्यांना 'माणूस' म्हणून जगता यावं...जीवन काळ वाढावा...कलंकरहित सर्वसामान्यांचं प्रतिष्ठित जीवन सारं भाग्योदय बनावं म्हणून!
 एका मित्राच्या जिव्हारी संवादाची अव्यवहारी वाट चालत गिरीश कुलकर्णी यांनी अहमदनगरमध्ये वेश्या वस्तीतील मुला-मुलींसाठी वसतिगृह चालवत आज स्नेहज्योत, स्पृहाकेंद्र, चाइल्ड लाईन, स्नेहांकुर, दत्तकविधान इ. केंद्र मैत्रेय फाऊंडेशन, सेंटर फॉर होप, स्नेहालय संकुल, विद्यार्थी साहाय्य समिती, बालभवन, सक्रिय युवा केंद्र आणि परवा परवा सुरू झालेलं नगर रेडिओ हे एफ.एम.चॅनल ...सर्वांचा ध्यास एकच...ज्यांना समाजाने नाकारलं, ठोकरलं, फसवलं, हेटाळलं, नासवलं त्यांच्या उसवलेल्या आयुष्य जोडणीत एक सहानुभूतीचा मदतीचा टाका घालायचा...हे सर्व करत गिरीश कुलकर्णी कुठेच असत नाहीत...
  या सर्व संस्थांचं जाळं गिरीशनी पोटापाण्याचा उद्योग म्हणून सुरू केलं नाही. पोटापाण्यासाठी तो एम.ए.एम.फिल., पीएच.डी. आहे. नगरच्या सारडा महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागाचा प्रमुख असलेला प्रा. डॉ. गिरीश कुलकर्णी सर्व भारतात फक्त 'गिरीश कुलकर्णी' म्हणूनच ओळखला जातो, ही त्याच्या मोठेपणाची लहान खूण. तो निगर्वी कार्यकर्ता. सर्वांना घेऊन जाण्याचे विलक्षण कौशल्य. काम करताना आव नाही की आवेश नाही. 'मी तो भारवाही हमाल'...अशी निरिच्छ विनम्रता...हे येतं प्रश्नाला भिडण्यातून. तुम्हाला एकदा का जीवन जगणं कळालं की, मग तुम्हीच तुमचे गायक होता...सूर तुमचा फेर धरू लागतात...मग तुमची साधी गुणगुणही जीवन गाणं होत राहते...यासाठी माणसास घर, काळ, वेळ सारी वेळापत्रकं रद्द करून कामाच्या गारुडामागं धावावं वाटतं...तुम्ही धावत राहता...'मै चलता चला...काँरवां बनता गया...' मागं फिरून पाहताना खरंच वाटत नाही की, हे आपण केलं असं वाटावं इतका कामाचा मोठा डोंगर 'स्नेहालय'च्या माध्यमातून गिरीश कुलकर्णी यांनी उभारला नि तोही कार्याच्या रौप्य महोत्सवापूर्वी...हे केवळ ध्यास नि समर्पणातूनच शक्य होतं!
 स्नेहालयाच्या अनोख्या मानवसेवेची प्रत्यक्ष सुरुवातही अशी अवचितच झाली. १९९२ साली अहमदनगरच्या एम.आय.डी.सी.मधील स्नेहालयाच्या

निराळं जग निराळी माणसं/११२