पान:निराळं जग, निराळी माणसं (Niral Jag, Nirali Manasa).pdf/10

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नाळ...न तुटलेली...न सुकलेली!

 ...वेश्यावस्तीतलं जग आपल्या जगापासून वेगळं, निराळं असतं. इथल्या घड्याळाचे काटे आपल्या घड्याळाच्या बरोबर विरुद्ध दिशेनं फिरत असतात. उदाहरणच द्यायचं झालं तर जेव्हा आपला दिवस मावळत असतो तेव्हा इथला उजाडत असतो. इथं झोप लागण्यासाठी कूस बदलावी लागत नाही... पाठ टेकली की डोळा लागलाच समजा.
 ...वेड्याचं घर उन्हात असं आपण नुसतं म्हणत, ऐकतच आलोय. पण वेड्याचं घर पाहिलंय कुणी? तुम्ही गेलात का कधी वेड्यांच्या इस्पितळात? नाही पाहू शकणार तुम्ही त्याचं रौद्र रूप! पण मी तुम्हाला अनुभवानं सांगेन, ते रौद्र रूप समाजाच्या क्रौर्याचं प्रतिबिंब असतं!
 ...अंधशाळा माझ्या लेखी समाजातलं सर्वात संवेदनक्षम ठिकाण! नुसतं आवाजावरनं जग, माणसं ओळखणं, अनुभवणं सोपं नसतं! स्पर्शानं माणूस कोण, कसा तुम्ही ओळखाल? अंध बांधव हमखास ओळखतात. न दिसता समजणारं हे जग म्हणजे समाजाच्या वास्तवाचं थर्मामीटरच!
 ... कोण म्हणतं स्त्री अबला? ती तर स्वयंप्रेरिका, स्वयंसिद्धा असते हे समजून घ्यायचं तर आत्मभान आलेल्या प्रत्येक स्त्रीची जगण्याची झुंज एकदा उमजून घ्यायलाच हवी... 'एक तरी ओवी आठवावी'...तशी. शाप घेऊन भले तुम्ही जन्माला आला असाल... जगत असाल, पण आतला आवाज एकदा का गवसला ना? मग गगनाला गवसणी घातलीच समजा. स्त्रीला गृहीत धरून जगायचा काळ संपला, हे पुरुषांनी एकदा समजून घ्यायलाच हवं असं मला वाटतं.
 ...धडधाकट शरीर घेऊन जगण्यात तो कसला पुरुषार्थ? मला हात नाही तरी मी पायाचे हात करतो नि कॉलेजात प्रथम येतो! मला बोटं पण नाहीत... मी दोन पंजात पेन, पेन्सिल, सळी घेतो अन् संगणक चालवून अमेरिकेतलं आऊटसोर्सिंग वर्क भारतात माझ्या घरी बसून करतो नि तुमच्यापेक्षा जास्त कमाई करतो नि तीही हात, बोटं असणा-या माणसांपेक्षा सफाईने व गतीनेही!