Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१२

काही येत नाहीं; माझा स्वामी मात्र कृपेसहित हृदयीं वसत आहे." असें ते नेहमीं म्हणतात.

 कित्येक लोकांचा असा आक्षेप आहे कीं, महाराजांस संस्कृत येत नाहीं; भाष्यें, उपनिषदें वगैरे न वाचतां हे साधु कसे असूं शकतील ? या अज्ञ लोकांस विद्वत्ता व आत्मज्ञान यांमधील फरक मुळींच कळत नाहीं. वेद कंठरवानें असें सांगत आहे :-

 द्वे विद्ये इह वेदितव्ये यत्परा चापरा चेति । अपरा यदृग्वेदो यजुर्वेदोऽथर्ववेदः सामवेदः । परा यया तदक्षरमधिगम्यते ।। "

 विद्वत्ता व आत्मज्ञान परा व अपरा विद्या, शब्दज्ञान व निःशब्दज्ञान यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. वेदशास्त्रांचें पठण केलें म्हणजे आत्मज्ञान होतेंच असें नाहीं ; वेदशास्त्राध्यायनावांचूनही आत्मज्ञान होणें शक्य आहे.

 "स्थाणुरयं भारहरो वेदानधीत्य न विजानाति योर्थऽम्" । "अनुभूतिं विना मूढो वृथा ब्रह्मणि मोदते । प्रतिबिंबितशाखाग्रफलास्वादनमोदवत् ॥”

 इत्यादि वेदांतील वाक्येंही केवळ विद्वत्ता व आत्मज्ञान यांतील फरक दाखवीत आहेत. प्रत्यक्ष अनुभव न मिळवितां केवळ वेदान्त वाचून आपण ब्रह्म झालों अशा कल्पनेनें कित्येक लोक फसून जातात !