पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बोलावलं नाही ना म्हणून त्याचा डूख असेल.”

 "मग आपले दोन सभासद तडकाफडकी गेले त्याचं काय? आणि आता आजारपणं मागं लागलीत ती कशापोटी ? त्यालाही तुझा हरीभट कारणीभूत आहे?"

 "आपले रास्ते - कुलकर्णी गेले ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आजारपण म्हणाल तर सगळीकडं साथ आहेच. हळूहळू ती कमी होईलच. तरीपण आपण पाणी टेस्ट करून बघू आणि तुम्ही सर्वांनी एवढं घाबरायचं काहीच कारण नाही. उद्या मी सुद्धा फटकन् मरु शकतो."

 "खरंच तसं झालं तर बरंच होईल. एकदा 'तिजा' झाली की सुटलो. देशमुखवर नेहमी खार खाणाऱ्या महाजनच्या मनात आलं!

 मग मंडळी पांगली.

 सांगायचं नव्हतं तरी महाजनच्या बायकोनं सगळ्यांच्या घरात हळूहळू जाऊन सभेचा सगळा अहवाल दिला. सगळ्या बायका मुळापासून हादरल्या. खरंच काही तरी करायला हवं. उगाच विषाची परीक्षा कशाला बघायची? सरळ त्या हरीभटाकडं जावं आणि सांगावं. काय शांत-बिंत म्हणतोय ते सगळं करून टाक म्हणावं. असा विचार सगळ्या बायकांमधून मूळ धरायला लागला होता. प्रत्येक बाई दुसऱ्या बाईला सांगत होती. तुझ्या नवऱ्याला जरा त्या हरिभटाकडं जायचं मनावर घ्यायला सांग असं आग्रह करून करून सांगत होती. खबरदारी म्हणून एकीने आपल्या मुलाचं हिमालयातलं ट्रेकिंग कॅन्सल केलं. दुसरीनं नवऱ्याच्या स्कूटरलाच कुलूप घालून टाकलं. तिसरीनं गिझरला शॉक बसतो असं सांगून गॅसवर पाणी तापवायला सुरूवात केली. वास्तविक पुरुष मंडळी काही भित्री नव्हती. पण बायकांच्या दहा दहा वेळेला बजावण्यानं लोकलमध्ये चढताना जपून चढू लागली. धावती लोकल, धावती बस पकडण्याचे प्रकार बंद झाले. सर्दी-पडसेसुद्धा एकमेकांपासून लपवू लागली. जोशीबुवांना जिन्यामध्येच लागोपाठ शिंका आल्या. त्यांच्या शिंका दणदणीत असत. सगळ्या बिल्डिंगला जाग आणत असत. जिन्यामध्ये त्यांच्या शिंकांचा आवाज ऐकून निकमने दार उघडलं. “काय रे जोशा, आजच्या शिंका काही नेहमीच्या वाटत नाहीत. काय होतंय तुला?" निकमचं बोलणं ऐकताच जोशीणबाईंनी लगबगीनं जोशीबुवांना घरात घेतलं. व्हिक्स चोपडून झोपवलं !

 सगळ्यांच्या डोक्यावर पत्रातल्या "इजा, बिजा आणि...." सवार झाल्या होत्या!

 आणि महाजनानं तर सगळ्यांना घाबरावयाचा चंगच बांधला असावा. तो म्हणे हरीभटाकडे जाऊन आला होता. निनावी पत्राचं ते कशाला कबूल करतील? त्यांनी पुन्हा बजावलं. उगाच विषाची परीक्षा बघू नका. त्या नरबळी गेलेल्या मजुराला म्हणे बायको आणि एक तान्हा मुलगा होता. त्यामुळे तीन बळी तो नक्की घेणारच. त्या

निखळलेलं मोरपीस / ९७