पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'हरिभटजीकडं आलेल्य। एका माणसाला वेगळंच वाटलं. तो म्हणाला की तुमच्या सगळ्या ब्लॉक्सची दारं दक्षिणेकडे उघडतात. वास्तुशास्त्राच्या दृष्टीनं ही गोष्ट अशुभ आहे.

 महाजन असं काही सांगायला लागला तेव्हा मात्र सोसायटीचा सगळ्यात सिनीअर मेंबर बुवा गोसावी उखडला.

 "काय मूर्खपणा चालवलाय रे तुम्ही लोकांनी? अरे कुणी घाबरवलं की लगेच आपण घाबरायचं का? दक्षिणेकडे दारं असणारी जगात किती घरं दाखवू तुम्हाला ? आणि हरिभट काय? आपल्याकडून पाच-दहा हजार उकळेल आणि गप्प बसेल. त्यानं शांत केली म्हणजे आपण सगळे अमर होणार आहोत कां ? उद्या त्यानं आणखी काही उठवलं की आपण पुन्हा असंच रडत बसायचं का? इतकं सशासारखं भित्रं होणं चांगलं का?"

 मग काही दिवस 'चैतन्य' मध्ये शांतता होती.

 काही दिवसच.

 बारा नंबरच्या ब्लॉकमधल्या साठेकडे डॉक्टरांच्या व्हिजिटस् दिसू लागल्या. तशी पुन्हा भीतीच्या नागानं फणा काढायला सुरूवात केली! साठेच्या बायकोनं एक-दोन दिवस नवऱ्याचा आजार लपवण्याचा प्रयत्न केला पण तिसऱ्या मजल्यावरचा ब्लॉक असल्याने औषधाला जाता-येताना आणि डॉक्टरांना घेऊन येताना तिला काहीच लपवता आले नाही. साठेला हुडहुडी भरून ताप चढायचा. कितीही ब्लॅकेटस् घातली तरी थंडी वाजत रहायची. एकशे चार-एकशे पाच डिग्री असा ताप चढायला लागला तेव्हा मात्र डॉक्टरांनी साठेला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायला सांगितलं. साठेबाईंचं धाबं दणाणलं. बिचारा आपला गरीब नवरा. ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. कुणाचा तरी शाप आम्हाला भोगायला लागतो! इजा, बिजा, आमच्या कां मागे लागावी? तिनं मनोमन सगळ्या देवांना नवस केले. तिसऱ्या मजल्यावरून स्ट्रेचरवर झोपवून साठेला खाली आणलं. तेव्हा दारा-दारातून गर्दी जमली होती. अॅम्बुलन्समध्ये ठेवताना सगळ्या सोळा ब्लॉक्समधील एकसष्ठ लोक अंगणात जमले होते. ती सगळी गर्दी बघितल्यावर साठे कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील चीड स्पष्ट दिसत होती. एरवी एवढी माणसं प्रेमापोटी थोडीच जमली असती? सर्वांना मनातून वाटत असेल की 'चैतन्य' सोसायटीच्या वतीने साठेच 'शहीद' व्हायला निघालाय.

 इजा, बिजा आणि तिजा !

 खरंच वाईट वाटलं. साठे बिचारा अगदी सीधासाधा, नाकासमोर चालणारा शांत माणूस. त्याच्यावर उगाच वेळ आली!

इजा बिजा आणि तिजा / ९८