पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिला होता की काय? आणि त्याच जागेवर आपण त्याच्या उरावर बिल्डिंग बांधून राहतोय?

 सर्वांच्या अंगावर सरसरून काटा आला! म्हणजे त्या निनावी पत्रातला मजकूर खरंच काही तरी 'इशारा' देतोय.

 सगळ्यांनी देशमुखवर हल्ला केला. जाब विचारला. भरपूर तोंडसुख घेतलं. सगळ्यांची तोंडं बोलून बोलून दुखू लागल्यावर ढीम्म बसलेला देशमुख म्हणाला,

 " अरे तुम्ही कुठल्या युगात राहताय ? नरबळी वगैरे केव्हा देतात ते तुम्हाला माहीत आहे कां?"

 “केव्हा?”

 "एखादा पूल बांधतात, टोलेजंग राजवाडा बांधतात तेव्हा जर का बांधकाम खचायला लागलं किंवा ढासळायला लागलं तर फार पुरातन काळात असली नरबळीची प्रथा होती. आता बांधकामाचं शास्त्र एवढं पुढं गेलय की ....."

 "मग पाया खणताना कवटी आणि हाडं मिळाली त्याचं काय? ते तर खोटं नाही ना?" महाजनानं जाब विचारला.

 "नाही ते खोटं नाही." देशमुख म्हणाला.

 "मग आम्हाला का नाही सांगितलंत?" सगळ्यांनी एकदम गिल्ला केला.

 "अरे बाबांनो, त्यात काय सांगायचं? पूर्वी इथं माळरान होतं. पाया खणतानाच कशाला, एरवीसुद्धा खड्ड्यातून तुम्हाला हाडं दिसतील. कुत्रीसुद्धा इकडून तिकडून आणून टाकतात. तुम्ही सगळ्यांनीच बघितली असतील."

 देशमुख सांगत होता ते काही अगदीच खोटं नव्हतं. पण ते सगळं स्वीकारण्याची कुणाची तयारी नव्हती.

 सगळ्यांच्या डोळ्यांसमोर ते पत्र नाचत होतं! महाजन म्हणाला,

 "मग ते पत्र लिहिणाऱ्याला कसं माहिती ?"

 “मी सांगतो. हे निनावी पत्र लिहिण्याचा हलकटपणा त्या कुडमुड्या हरीभटाचा असणार."

 "म्हणजे?” सगळ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं.

 “त्या हरीभटाला उद्योग नसतो. पहिली कुदळ मारायची, त्या आधीच तो माझ्याकडं आलां होता. या आण्णानंच त्याला कवटीचं, हाडाचं सांगितलं असणार. चार-पाच हजार खर्चून शांत करू या असं सांगत होता. वास्तूशांत करायला त्याला मी

इजा बिजा आणि तिजा / ९६