पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुणाला डिसेंटरी तर कुणाला नुसतीच पोटदुखी. अंथरूण धरलं की प्रत्येकाला त्या पत्रातला मजकूर आठवायचा.

 "इजा, बिजा आणि ." मनोमन थरकाप व्हायचा.

 सेक्रेटरी देशमुखला सर्वजण फैलावर घ्यायचे. सात नंबरच्या जोशीकडे कुणी तरी बोअरींग काढणारे तज्ञ पाहुणे म्हणून आले होते. ते म्हणाले,

 "अहो, तुम्ही पाणी चेक करून घ्या. माझ्या हिशोबाने बोअरींगचे पाणी आणि रस्त्याकडेच्या गटारातून जमिनीत खोलवर झिरपत जाणारं पाणी एक होतंय. त्या दूषित पाण्यामुळेच सोसायटीत सगळ्यांना त्रास होतोय."

 बोअरिंगची आयडिया होती सेक्रेटरी देशमुखची. त्याचं म्हणणं म्युन्सिपाल्टीचं पाणी काही चोवीस तास मिळत नाही. म्हणून आपण बोअरिंग काढू. म्हणजे तेच पाणी प्यायला होईल. आणि गच्चीवरल्या टाकीमध्ये चढविलं की घरकामाला पण होईल. म्युन्सिपाल्टीचं पाण्याचं बील आयतं कमी होईल.

 त्यावेळी सगळ्यांनी माना डोलावल्या होत्या.

 आता माना ‘मोडायची' वेळ आली तेव्हा सगळेजण कुरकुरू लागले. सात नंबरच्या जोशीची बातमी होती की त्यावेळी सेक्रेटरी देशमुखनं आपल्याच नातेवाईकाला बोअरींगचं काम देऊन 'कमिशन' उपटलं. आता पुन्हा खोदाई करून लीकेज वगैरे नाही ना हे बघावं लागेल. पाण्याचा नमुना लॅबोरेटरीतून चेक् करावा लागेल.

 पण अकरा नंबरच्या महाजनने एक वेगळाच स्फोट केला. इमर्जन्सी मीटींग असल्यासारखे त्याने सर्व पुरुष सभासदांना गच्चीत बोलावलं. त्याच्याबरोबर बिल्डिंगचं काम चालू असताना, सोसायटीच्या प्लॉटमध्ये झोपडं टाकून राहणाऱ्या रखवालदाराला- आण्णाला पाहून सर्वांना आश्चर्य वाटलं. पण खरं आक्रित तो बोलल्यावर घडलं.

 महाजन त्याला म्हणाला,

 “हंऽऽ, आण्णा पाया खणताना तू काय बघितलंस ते तुझ्या काळभैरवाची शपथ घेऊन खरं खरं सांग."

 आण्णानं एकवार सगळ्याकडं बघितलं, मग सेक्रेटरी देशमुखकडं पाहून खाली मान घालून तो म्हणाला,

 "आता सप्पत घेतलीय तवा खोटं कसं बोलणार? पाया खणताना आम्हाला एक कवटी आणि काही हाडं मिळाली होती. देशमुख सायबाना ठावं हाय."

 हा म्हणजे एक बॉम्बस्फोटच होता. बापरे, म्हणजे खरंच या जागेवर नरबळी

निखळलेलं मोरपीस / ९५