पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही सरपणच लागलं नाही. कापरासारखा भर्रकन् जळला." त्यावर जाधव म्हणाला, “तू माझी टवाळी केलीस तर मी तुला कधीच फुकट पाजणार नाही. पण मी खरच गेलो तर माझ्या बॉडीतून निळी फ्लेम येते का ते बघून ठेव. पोटात सगळी अल्कलीच भरलीय म्हणून म्हणतो."

 जाधवचा बिनधास्तपणा बघून बाकीचे हबकायचेच.

 तीन महिन्याच्या आत दोन मृत्यू! तसा काही आजार नसताना, दोघांचीही पस्तीशी जेमतेम उलटली असताना!

 घटना दुःखदायक नक्कीच होती.

 पण अख्खी बिल्डिंग हवालदील झाली होती. भयग्रस्त झाली होती. त्याला दोघांचा आकस्मिक मृत्यू एवढंच कारण नव्हतं!

 मोठं कारण होतं ते त्या निनावी पत्राचं. बरं, ते पत्र एकाला कुणाला तरी यावं की नाही? सोसायटीच्या प्रत्येकाच्या लेटरबॉक्समध्ये तांबड्या शाईनं लिहिलेलं पत्र.

 सगळ्याचा मजकूर एकच. "पूर्वी या जमिनीत एका मजुराचा नरबळी गेलाय. आमच्या 'भूत'शास्त्राप्रमाणे तो तिघांचा बळी मागतोय. दोन गेलेत. तिसरा जाणार. इजा, बिजा..... आणि......"

 त्या पत्रापासून मनोमन सगळी हबकून गेली होती. सेक्रेटरी देशमुख म्हणजे डॉ. लागूंचा अवतार! अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्वर्यू. त्यानं पत्र वाचताच सगळ्यांसमोर तुकडे केले. कुणी काही त्यावेळी बोललं नाही. पण देशमुखाचा उद्धटपणा . कुणाला आवडला नाही.

 आणि त्यानंतर खरोखरच सर्वजण हवालदील झाले. कारण सगळीकडे विचित्र साथ आली. घरोघरी माणसं आजारी पडू लागली. डॉक्टरांना पण सुरूवातीला निदान होईना. पेशंटला भरभरून ताप येई. मळमळ होई. अस्वस्थ वाटे. मेडिकल असोसिएशनच्या बैठकी झाल्या. तज्ञ डॉक्टर आले. ताबडतोबीने संशोधन झालं. औषधे निघाली. लस टोचली गेली. टॉयफॉईड- मलेरीया आणि जॉँडिस अशा 'त्रिमूर्ती' ज्यात एकरूप झाल्यात असा कुठला तरी भयानक आजार होता. कुणी म्हणत की पाणी पुरवणाऱ्या पाण्याच्या टाकीत एक बाई मरून पडली. कुणी म्हणत की त्या पाण्यात डुकरांचे, कबुतरांचे मृतदेह सापडले, म्हणून साथ फैलावली.

 पण विचित्र गोष्ट म्हणजे सगळीकडची साथ आटोक्यात आली तरी 'चैतन्य' सोसायटीमधील आजारपणं संपेचनात. प्रत्येकाच्या घरातून कुणी ना कुणी आजारी पडायचं. कुणाला ताप चढायचा. कुणाला पोट पिरगळून उलट्या निघतात असं वाटायचं.

इजा बिजा आणि तिजा / ९४