पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५. इजा बिजा आणि तिजा

 गेल्या काही दिवसात 'चैतन्य' सोसायटीमधला सगळा उत्साहच मरून गेला होता.

 अवघ्या चार-सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या बिल्डिंगमधील माणसांचे चेहेरे रंग उडालेल्या, टवके निघालेल्या भिंतीसारखे दिसत होते. थाटामाटात वास्तुशांतीचा समारंभ झाल्यावर सगळी माणसं कशी नववधूच्या नवलाईने वावरत होती. प्रत्येक रविवारी कुणाला तरी कापून 'सेलेब्रेशन' व्हायचं. शनिवारच्या रात्री पान खाण्यासाठी पुरुष मंडळी कोपऱ्यावर घोळक्यानं जायची. टिंगलटवाळी चालायची. मग कॅरम खेळायची. कुणी रमी नाहीतर ब्रिजचे डाव मांडायचे. मुलं अंगणात बॅडमिंटन खेळायची. क्रिकेटचा आरडाओरडा व्हायचा. बायकांची भिशी चालू झाली होती. 'आता नव्या वास्तूमध्ये पुन्हा एकदा 'चान्स' घ्यायला पाहिजेस हं.' अशी एकमेकीची चेष्टा चालायची. सोसायटीची मीटींग उगाचच कुठल्या तरी मुद्यावरून लांबत चालली. दूरवरचे रात्रीचे बाराचे टोल ऐकू आले की सोसायटीचा 'कोट्याधीश' निकम डोळे मिचकावत म्हणायचा, ‘'चला आता 'जवळजवळ' झोपायची वेळ झालीच म्हणायची." त्याच्या कोटीला दाद देत मनातलं बोलला असं म्हणत सर्वजण सभा बरखास्तीची सूचना आनंदाने मान्य करत.

  पण अचानक या सगळ्याला दृष्टच पडली म्हणायची!

 तीन नंबर ब्लॉकचा धडधाकट प्रकृतीचा रास्ते तडकाफडकी हार्ट अॅटॅकने गेला. ध्यानी मनी नसताना मस्त हिरवळीवरुन चालता चालता अचानक बाभळीचा काटा खुपल्यासारखं झालं.

 त्यानंतर दोनच महिन्यात पाच नंबरच्या ब्लॉकमधील कुलकर्ण्यानं प्राण सोडला तेव्हा सगळीजण दिग्मूढच झाली. खरं तर त्याच्या आजाराचं निदानच नीटसं झालं नाही. कुणा डॉक्टरच्या मते कावीळ होती. कुणाच्या मते आंतड्यांचा कॅन्सर होता. कुणी खाजगीत हळूच कानात सांगत की "तो फार प्यायचा. ऑफिसातील कस्टमरबरोबर जायचा आणि हूंऽऽ म्हणून व्हिस्की, रम, बीअर ढोसायचा. कधी कधी कंट्रीपण प्यायचा म्हणे. खरं खोटं देव जाणे." स्मशानात निकमने जाधवकडं पहात तेवढ्यात विनोद केलाच. तो जाधवला म्हणाला, "लेका तू पण फार ढोसतोस. या कुलकर्ण्याला बघ

निखळलेलं मोरपीस / ९३