पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आज औरंगजेब एक नाही तर अनेक आहेत. सर्व क्षेत्रांमध्ये आहेत. आपल्या रक्ताचं खतपाणी करुन, आपल्या वाडवडिलांनी मिळविलेलं स्वराज्य हे खऱ्या अर्थानं स्वराज्य व्हायला हवं असेल तर आज समाजपुरुषानं शिस्तपालनाचे, कर्तव्यपालनाचे धडे, आप धुरिणत्व करणाऱ्या नेत्यांना घालून दिले पाहिजेत. समाजाच्या नैतिकतेचा दबाव, अंकुश म्हण, त्यांच्यावर राहिला पाहिजे. 'यथा प्रजा तथा राजा' अशी प्रक्रिया सुरु झाली पाहिजे. कारण राज्यशकट हाकणारी माणसं आता प्रजेमधूनच निर्माण होतात. लोकशाहीची हीच मागणी आहे."

 "पण सरदारसाहेब हे कसं काय जमणार? लोकांचा प्रभाव नेतृत्वावर कसा पडू शकेल?"

 “पडायला हवा. इथंच तर आपली परीक्षा आहे! गंमत म्हणून आमच्याच गावातलं एक उदाहरण देतो. आमच्या गावच्या शाळेत एक मास्तर होता. मुलांना शिकवण्याकडं त्याचं लक्ष कधीच नसायचं. गावच्या गुंड, बेरकी सरपंचाच्या टोळक्यात त्याची उठबस असायची. वर्गात मास्तरच नसल्यानं मुलं काय हुंदडायला पसार व्हायची. त्या वर्गात एक मुलगा होता. सगळ्या मुलांपेक्षा वेगळा होता. त्याला हा प्रकार सहन होईना. गावातील चार चांगल्या लोकांकडं जाऊन त्यानं सगळ्या विषयांचा अभ्यास सुरु केला. शाळेत वेळेवर जायचा. स्वत: घंटा द्यायचा. वर्गावर जायचा. हजेरीबुक भरायचा आणि चक्क शिकवायला लागायचा! सुरुवातीला त्याची खूप टिंगल झाली. टवाळी झाली. क्वचित मारहाणही झाली. पण घोरपडीसारखा तो मुलगा आपल्या कार्यक्रमाला चिकटून राहिला. त्याची चिकाटी, निश्चय बघून आणखी दोन चार मुलं त्याला मिळाली. मग त्यांनी कामं वाटून घेतली. रोज अकराच्या ठोक्याला झाडून पुसून शाळा लख्ख व्हायची. हळूहळू मुलं कुतूहलापोटी जमायला लागली. तेव्हा या दोन चार मुलांनी सगळ्यांचा अभ्यास घ्यायला सुरुवात केली. सगळ्यांना कौतुक वाटलं. काही वडीलधारी माणसं, मुद्दाम शाळेत येऊन शेरेबुकात उत्तम शेरा लिहून जायची. शाळेची ही 'कीर्ती' त्या मास्तरच्या कानावर जायला लागली. सर्वत्र त्याचं हसूं व्हायला लागलं. मुलांच्या नैतिकतेचा दबाव त्याला सहन होईना. मग मात्र मुकाट्यानं एक दिवस तो शाळेत आला. व्यवस्थित शिकवू लागला...."

 "सरदारसाहेब बस्” मी एकदम नमस्कार केला. "आजवर मी इतिहास नुसताच वाचत होतो. आज मला इतिहासाचा साक्षात्कार झालाय. या उजेडात वाटचाल कशी करायची, इतरांकडून कशी करून घ्यायची याची स्पष्ट जाणीव मला व्हायला लागलीय."

  मी सरदारसाहेबांकडं बघितलं तर त्या इतिहास-पुरुषाच्या डोळ्यात पाणी तरळत

होतं!

इतिहासाचा साक्षात्कार / ९२