पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एक लोकयुद्ध होतं. अशा दृष्टीनं की हे युद्ध नुसतं रणांगणावर लढलं गेलं नाही तर ते गावागावातून, शेताशेतातून लढलं गेलं. शिवछत्रपतींनी स्वराज्य कमावलं. पण त्यापेक्षाही अधिक मोठं काम केलं ते म्हणजे स्वातंत्र्यप्रेमाची आणि स्वराज्याभिमानाची अखंड ज्योत रयतेतील प्रत्येकाच्या अंत:करणात तेवत ठेवली. प्रत्येक लहानथोर माणसाने हे राज्य माझं आहे आणि ते माझंच राहिलं पाहिजे अशी जणू काही शपथच घेतली होती. औरंगजेबाने हाय खाल्ली ती संताजी धनाजीच्या पराक्रमामुळे हे खरंच. पण संपूर्ण जनता त्याच्याशी सर्व स्तरावर युद्ध करीत होती. हे दृश्य त्याला अगदी नवीन होते. दाणा-वैरण न मिळू देणारी, गावंच्या गावं जाळून औरंगजेबाच्या सैन्याला पाण्याच्या थेंबालासुद्धा मोताद बनविणारी सामान्य जनता औरंगजेबाला सळो की पळो करून सोडत होती. त्या काळातील कवी विठ्ठलदासाचे कवनच ऐक. म्हणजे समाजाच्या सर्व थराची माणसं या लोकयुद्धात कशी गुंतली होती ते कळेल. तो कवी म्हणतो, "पाटील, सेटे, कुणबी, जुलाई, चांभार, कुंभार, परिट, न्हावी, सोनार, कोळी, ऊदीम, पुलारी यावेगळे लोक किती बिगारी...." मला सगळी कविता पाठ नाही. पुढे युद्धाचं वर्णन आहे. मराठी रयतेच्या विविध थरातील लोक तसे या स्वातंत्र्ययुद्धात उत्स्फूर्तपणे सामील झाले होते. ते तुला मला सांगायचं होतं."

 सरदारसाहेब त्या ऐतिहासिक काळातच स्वतःला हरवून बसले होते. पुण्यात शिक्षण झाल्यानं आणि विद्वानांच्या सहवासात सतत वावर असल्यानं त्यांची बोली शुद्ध झाली होतीच पण कधी कधी पुस्तकी वाटायची. त्यांना माझ्या अस्तित्वाची जाणीव तरी होती की नाही हेच कळत नव्हतं. एखादे स्वगत बोलल्यासारखं त्यांचं बोलणं चाललं होतं. त्यांच्या बोलण्याचा नेमका उद्देश मला मात्र उमगत नव्हता. माझ्याकडं वळून पहात सरदारसाहेब पुन्हा बोलू लागले.

 

 "मला काय सांगायचं आहे ते मी स्पष्ट करतो. जनता अशी सर्व स्तरांवर जागरुक आणि सावध असल्यामुळं त्याचं एक नैतिक वजन आपोआपच राज्यशकट चालवणाऱ्या मुत्सद्यांवर आणि सेनापतींवर पडलं होतं. त्यामुळेच त्या स्वातंत्र्ययुद्धात लोकांचा विजय झाला. औरंगजेबाचा पराभव झाला. आज स्वराज्य मिळून अर्धशतक लोटलं. स्वराज्य म्हणजे परकीय दास्यातून मुक्तता एवढाच अर्थ होत नाही तर स्वकीय, जुलुमी, अत्याचारी, स्वैराचारी आणि बेजबाबदार लोकांपासून मुक्तता असाही स्वराज्याचा अर्थ असायला हवा. नाही कां?"

 "मी मान डोलावली. सरदारसाहेब पुढे म्हणाले,

 "जसं शिवबानं मिळवलेलं राज्य पुन्हा परकीयांच्या घशात जाऊ नये म्हणून त्यावेळची रयत जागृत राहिली. आपापली कर्तव्ये पार पाडत राहिली, तशा समाजाची आज आत्यंतिक गरज आहे. आजच्या घडीला आपला देश तसा निर्नायकीच आहे.

निखळलेलं मोरपीस / ९१