पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "हो."

 "मग तुला कोणता कालखंड जास्ती आवडतो?"

 "अर्थात शिवकाल. शिवछत्रपतींविषयी जे जे मिळेल ते वाचून काढतो. प्रत्येकवेळी महाराजांचा नवीन पैलू लक्षात येतो. मला प्रामाणिकपणाने वाटतं की, खरेखुरे शिवराय त्यांच्या संपूर्ण योग्यतेसह, कर्तृत्वासह अजून आपल्या हाती आलेच नाहीत..."

 मला मध्येच तोडत सरदारसाहेब म्हणाले, 'त्याविषयी प्रश्नच नाही. साऱ्या जगतात असा अलौकिक पुरुष आढळायचा नाही. पण इतिहासापासून काहीतरी शिकायला हवं, बोध घ्यायला हवा."

 मला सरदारसाहेबांचा रोख लक्षात येईना. ते पुढे म्हणाले, "त्यादृष्टीने तू १६८० ते १७०७ या कालखंडाचा अधिक विचार कर, मनन कर."

 “हो, त्याला तर आपण मराठ्यांच्या स्वातंत्र्ययुद्धाचाच कालखंड समजतो.”

 "मग त्या पार्श्वभूमीवर आजच्या परिस्थितीचा विचार कर.”

 "म्हणजे कसा?"

 "असं बघ. शिवछत्रपतींच्या मृत्यूनंतर मराठी राज्य तसं निर्नायकी होतं. म्हणजे छत्रपती संभाजी, राजाराम आणि ताराबाईसाहेब यांनी या कालखंडात जरुर नेतृत्व पुरवलं तरी शिवरायांच्या उत्तुंग अशा नेतृत्वाच्या तुलनेत ही सारी नेतृत्व तशी खुजी होती. सर्वंकश नेतृत्व देणारी नव्हती. हे पटतं ना?"

 "हो तर, ती एक वस्तुस्थिती होती."

 "मग आजची राजकीय परिस्थिती लक्षात घे. स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी जी उत्तुंग, निष्कलंक चारित्र्याची, देशहिताला प्राधान्य देणारी, अशी नेतृत्वं या देशाला लाभली तशी स्वातंत्र्योत्तर काळात लाभली नाहीत. आज एका मागोमाग एक मंत्रिमंडळ कोसळणं, पंतप्रधान बदलणं, पर्यायाने स्थैर्य गमावणं ही सारी परिस्थिती कुणामुळे निर्माण होत आहे असं वाटतं?"

 "कुणामुळे?"

 "अर्थातच तुझ्या-माझ्यामुळे. म्हणजेच सर्वसामान्य जनतेमुळे. मला जर विचारशील तर सर्वसामान्यांनी आपल्यासमोर सतत १६८० ते १७०७ हा कालखंड आणि त्या काळातील सर्वसामान्य जनतेची वर्तणूक डोळ्यांसमोर ठेवावी. अवघं मराठी राज्य बुडवायला आलेला बलाढ्य औरंगजेब पुरता नेस्तनाबूत झाला. तो काही नुसत्या संताजी धनाजीच्या पराक्रमामुळे नव्हे किंवा रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण यांच्या मुत्सद्देगिरीमुळे नव्हे, तर सर्वसामान्य रयतेच्या जागरूकतेमुळे. खऱ्या अर्थाने

इतिहासाचा साक्षात्कार / ९०