पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "हो. बहुधा तेवढ्यात काम होईल."

 "मग आमच्या बंगल्यावर का राहात नाहीत? संकोच नको. चांगल्या कामासाठी आमचं घर नेहमी उघडं आहे."

 "थँक्स, पण बाळासाहेबांनी आधीच सगळी व्यवस्था केलीय." "ठीक आहे. मी घरात असतो नसतो. काय लागेल ते मागून घ्या. मी कारकुनाला, आमच्या आण्णाप्पाला सांगून ठेवलंय."

 त्यानंतर मी नियमितपणे त्या अभ्यासिकेत जाऊन बसायला लागलो. इतक्या सुंदर वातावरणात आणि सुसज्ज अभ्यासिकेत काम करण्याचा योग कधीच आला नव्हता. मी कामाला सुरुवात करण्यापूर्वी चहाचा ट्रे येत असे. सरदारसाहेब बरेचदा नसत. त्यांच्याकडे नेहमी कुणाची ना कुणाची ये-जा असे. अथवा त्यांना कुठं ना कुठं जायचं असे. पण जेव्हा केव्हा बंगल्यावर असत तेव्हा आवर्जून माझं काम बघून जात. मी काढलेली टांचणे काळजीपूर्वक बघत. काही सूचना देत. माझं काम त्यांना आवडलं असावं कारण मी एक दिवस कामाला सुरुवात करण्यापूर्वी त्यांनी मला बोलावलं. अतिशय सुंदर वेष्टनाचा देखणा आणि भला दांडगा ग्रंथ त्यांनी माझ्या हातात ठेवला. हिंदुस्थानातील विलिनीकरणाच्या वेळी अस्तित्वात असलेल्या सहाशे - सातशे राजघराण्यांविषयी इत्थंभूत माहिती त्या ग्रंथात संकलित केलेली होती. त्यात माझ्या कामाला उपयुक्त अशी अनेक नामवंत सरदार घराणी होती. मी हरखूनच गेलो. माझ्या चेहेऱ्यावरचा परमावधीचा आनंद आणि औत्सुक्य न्याहाळीत व आपल्या भरदार मिशा कुरवाळीत ते म्हणाले,

 "मी प्रौढी म्हणून सांगत नाही. परंतू हा प्रचंड ग्रंथ महाराष्ट्रात फार तर पाच- सहा ठिकाणीच आढळेल. तू खूप मेहनती आणि होतकरु दिसतोस. म्हणून तुला अभ्यासासाठी देतोय. मात्र काम करुन परत जाताना आठवणीनं आण्णाप्पाच्या ताब्यात देत जा."

 मला नवल वाटलं. पुणं मुंबई सोडून एखाद्या आडगावात अशी अमूल्य माहिती मिळेल, अशी दानत, दिलदारी आढळेल याची सुतराम् कल्पना नव्हती. आपला प्रकल्प चांगलाच यशस्वी होणार याची मला नव्यानेच उमेद वाटू लागली. मी दुप्पट उत्साहाने कामाला लागलो.

 महिन्याभरात माझं काम संपलं.

 मी सरदारसाहेबांचा निरोप घ्यायला गेलो तेव्हा ते बागेत बसले होते. गप्पा मारता मारता सरदारसाहेबांनी विचारलं, "जोशा, (माझ्या जोशी आडनावाचं संक्षिप्तीकरण) मराठ्यांचा इतिहास हा तुझ्या आवडीचा विषय ना?"

निखळलेलं मोरपीस / ८९