पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुझ्याविषयी सगळं सांगितलंय."

 "अरे हो, त्यांची चिट्टी द्यायला मी विसरलोच."

 "राहू दे, राहू दे. आता त्याची काही आवश्यकता पण नाही.' ते म्हणाले. नंतर आम्ही एका मोठ्या दालनात गेलो. मक्याची गरम गरम भाजलेली कणसं, भुईमुगाच्या शेंगा, लुसलुशीतशी मक्यांच्या कणसांची उसळ, रसरशीत पपया, केळी, असा नाश्त्याला गावरान मेवा होता. नाही म्हटलं तरी मी लोभावलोच! सरदारसाहेब अघळपघळ बोलत होते. मनमोकळेपणाने जुन्या गंमतीजमती सांगत होते. माझी भीड चेपली. संकोच गळून पडला. बराच वेळ आमचा नाश्ता चालला होता. मी मनातल्या मनात चुळबुळत होतो. नुसत्या आदरातिथ्यातच वेळ वाया जाणार की काय? माझ्या पोटात ही काळजी होती. अनेक अमीर उमरावांच्या घरात माझी अशीच बोळवण झाली होती. हाती माहिती काहीच लागली नव्हती. येssरे माझ्या मागल्या.

 पण सरदारसाहेब मनकवडे असावेत. म्हणाले, "चल, आपण माझ्या अभ्यासिकेत जाऊ."

 मग आम्ही मुख्य बंगल्याला लागून असलेल्या एका छोट्या बंगलीत गेलो. सरदारसाहेबांचा कारकून लगबगीने पुढे आला. मान लववून त्यानें त्यांना नमस्कार केला आणि त्याबरोबर मला पण. मलाच ओशाळल्यासारखे झाले.

 अभ्यासिका म्हणजे एखाद्या जुन्या संस्थानिकाचा दप्तरखाना होता. मला पाहिजे होता, अगदी तसाच म्हणजे अनेक सरदार घराण्यांच्या वंशावळी, त्यांचे पत्रव्यवहार, काही बखरी, हस्तलिखिते, सनावळी, ऐतिहासिक ग्रंथ, दुर्मिळ इतिहास विषयक पुस्तके असा सगळा मामला. म्हणजे ते एक वस्तुसंग्रहालयच होते. हॉलमध्ये म्हणजे अभ्यासिकेच्या हॉलमध्ये दोन मोठ्या खिडक्यांच्या जवळ दोन शिसवी लाकडाची टेबले आणि खुर्च्या होत्या. एक आरामखुर्चीपण होती.

 कारकुनानं मला सगळं दाखवलं. पुस्तकांच्या याद्या दिल्या. मी सर्व बघून बाहेरआलो.

 सरदारसाहेब दिसले नाहीत म्हणून इकडे-तिकडे बघू लागलो. तेवढ्यात एक नोकर बाहेर आला. म्हणाला, “साहेब व्हरांड्यामधी बसल्याती. तकडंच बलावलय."

 सरदारसाहेबांकडे तीन-चार माणसं आली होती. मला बघताच ते म्हणाले, "मी तुमचं नाव घरात सगळ्यांना सांगून ठेवलंय. सगळी व्यवस्था आहे. पाहिजे तितका वेळ बसा आणि काम करा. एकदम आठवल्यासारखं करत ते म्हणाले, “महिनाभर रहाणार ना?"

इतिहासाचा साक्षात्कार / ८८