पान:निखळलेलं मोरपीस.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बघवणार?...

 गावात भली माणसं होती, तशी राजकीय महत्त्वाकांक्षा बाळगणारी मंडळी होती. स्वार्थानं स्वत:ची तुंबडी भरू पाहणारी माणसं होती. त्यांना हा सगळा भागच 'इंडस्ट्रिअल इस्टेट' म्हणून घोषित करून हवा होता. गावाजवळ मोठा कारखाना हवा होता. तशी त्यांची अनेक दिवस सरकार दरबारी खटपट चालू होती. त्यांना यश आलं. मोठा थोरला कारखाना गावाजवळ उभारला गेला. आसपासचा भाग 'इंडस्ट्रिअल एरिया' म्हणून जाहीर झाला. शे-दोनशे कारखाने उभारले गेले. स्टेशन मोठे झाले. रस्ते रुंदावले. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पाव-भाजीच्या गाड्या आल्या. रुंद रस्त्यावरून मोठमोठ्या कंपन्यांच्या बसगाड्या धावू लागल्या. दुकानं वाढली. इंडस्ट्रिअल एरीयात जाण्यासाठी स्टेशनपासून बसेस धावू लागल्या. जुने पुराणे पाच-पंचवीस टांगेवाले भांबावून बघत होते. तेवढ्यात त्याच्या अंगावरून 'पोऽपो' करीत रिक्षा धावू लागल्या. एक व्ही. टी. कडची लोकलगाडी आली की एखादा सिनेमा, सर्कसचा खेळ सुटावा तशी प्रचंड संख्येने माणसं रस्त्यावर दिसू लागली. जाता येता, रस्त्याच्या कडेला उभं राहून बटाटावडा, पावभाजी खाऊ लागली. वर गरमागरम चाय् तर कधी मेवाडवाल्याचं आईस्क्रिम.

 आटपाट नगर विस्मयचकीत मुद्रेने बघायला लागलं. आपलं गाव मोठं होतंय, होऊद्या. चांगलंच आहे असं गाववाले म्हणू लागले. पूर्वी सदूभाऊ - रामभाऊंची गिरगाव- दादरवाल्या मित्रांशी भांडणं व्हायची.

 “काय रे तुझं गाव? किती लांब? किती दूर? नुसतं ऑफिसला पोचायचं म्हणजे दीड-दोन तास मोडतात आणि डास किती रे तुझ्या गावात ?"

 "अरे, माझ्या गावात जितके डास, तितकी शिंची तुझ्या दादर-गिरगावला माणसं! जरा रस्त्यानं चालायची सोय नाही. नसता कलकलाट, गोंगाट. त्यापरीस डास बरे."

 सदूभाऊ - रामभाऊ - मोरूतात्यांची मुलं आता मोठी झाली होती. गाव मोठं झालं, तशी वस्ती वाढली. वस्ती वाढली तशी छोटी घरं पुरेनाशी झाली. त्या शांत अशा चितोडगडावर एका नव्याच अल्लाउद्दीन खिलजीची स्वारी झाली होती, त्याचं नाव होतं, ‘बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर' ऊर्फ 'बिल्डर'. त्यांनी सदूभाऊ - रामभाऊंच्या नादी न लागता त्यांच्या मुलांना गाठलं. त्यांना सांगू लागले, "अरे घर पाडायचं म्हणजे काय ? नव्यानं बांधायचे. मोऽऽट्टी थोरली बिल्डिंग बांधायची. तुम्ही काऽऽही करायचं नाही. म्युनिसिपालिटीची परवानगी वगैरे सर्व आम्ही करू. तुम्हा प्रत्येक भावंडाला एक-एक स्वतंत्र ब्लॉक आणि वर शिवाय एक लाख रूपये रोख." रेल्वेत, म्युनिसिपालिटीत काम करणारी ती माणसं. प्रॉ. फंड अधिक ग्रॅच्युइटीच्या वेळीच मोठ्या रकमांचे आकडे त्यांच्या

 आटपाट नगर होतं / ८