पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१. आटपाट नगर होतं ... !

 आटपाट नगर होतं. छोटे छोटे रस्ते. टुमदार घरं. रस्त्याच्या दुतर्फा झाडी. प्रत्येक घराला भलं थोरलं अंगण. अंगणात तुळशीवृंदावन. सभोवती हौसेनं केलेली फुलबाग. शांताआजीच्या बोटाला धरून छोटी मिनू परडीत फुलं गोळा करायची. शांताआजी तोवर हिरवळीवरच्या दुर्वा काढत. भाऊकाका गदागदा पारिजात हलवायचे. पांढरा शुभ्र सडा पडायचा. मिनूला आपल्या चिमुकल्या हातांनी किती फुलं गोळा करू नि किती नको असं होऊन जायचं. तेवढ्यात महादू न्हावी दुकान उघडायला जाता जाता दारातूनच ओरडून विचारायचा,

 "शांताआजी, शेवग्याला खूप बहर आलाय. चार शेंगा काढू का?'

  "मेल्या, त्यात विचारायचं ते काय? तुला घे. आम्हालाही चार काढून ठेव."

 सकाळचा ‘मॉर्निंग वॉक' घेऊन येता येता गणूतात्या, मोरूभाऊ दाराशी थबकत. ओरडून विचारत,

 "भाऊ, पेपर आला का रे?'

 पेपर आला असो वा नसो. पेपराशी देणंघेणं थोडंच असायचं? ती हाळी म्हणजे केवळ त्यांच्या आगमनाची सूचना असे. मग भाऊंबरोबर व्हरांड्यातच बैठक होई. शांताआजींच्या हातचा कमी साखरेचा चहा झाला की मंडळी बाहेर पडत. मग ऑफिसात जाणाऱ्या मुलांच्या सुनांच्या धावपळी चालू होत. त्यांची पोळी भाजी झाली की निघाली मंडळी स्टेशनच्या दिशेने लोकल गाठायला.

 


 थोड्याफार फरकाने साऱ्या आटपाट नगरांचं हेच दृश्य असायचं. मंडळी मोजकी होती. जिव्हाळा घराघरातून ओथंबून वाहत होता. एकमेकांना एकमेकांविषयी कौतुक होतं, आदर होता.

 पण सुखाने नांदत असलेला चितोडगड कोण्या अल्लाउद्दीन खिलजीला कसा

निखळलेलं मोरपीस / ७