पान:निखळलेलं मोरपीस.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कानावर यायचे. ती हरखून गेली. स्तिमित झाली. काही न करता, घरबसल्या एवढे पैसे? विचार कसला करताय? घ्या आमचीही अॅग्रिमेन्टवर सही आणि मारा कुदळ. हां हां म्हणता अल्लाउद्दीन खिलजीने गावभर आपले पाय पसरले. कुणाच्या घरी थोडी आदळआपट झाली. तरण्याताठ्या मुलांनी, सुनांनी आपापल्या घरी 'म्हाताऱ्याला' चक्क सुनावलं, ‘’आता तुमचे असे कितीसे दिवस राहिलेत या जगात? का उगाच 'माझं घर, माझं घर' म्हणून उर पिटताय? का आमच्या सुखाच्या आड येताय?" बघता बघता घरं कोसळून पडली! दारासमोरची नारळीची झाडे कोलमडली. आंब्यांच्या झाडावर कुऱ्हाड पडली. तुळशीवृंदावन उखडलं गेलं. फुलबाग उध्वस्त झाली. शेवग्याच्या शेंगा परसात मिळेनाशा झाल्या. भलं थोरलं अंगण इतिहासजमा झालं. एकमेकांच्या सहवास उन-पाऊस झेलत राहणाऱ्या छोट्या-छोट्या वास्तू बिल्डरच्या यज्ञात बळी जाऊ लागल्या. अल्लाउद्दीनची पापी नजर पडण्याआधी जिवाचा जौहार मांडणाऱ्या रजपूत- रमणीसारखी त्यांची अवस्था झाली होती.......

 अजून कधीमधी शांताआजी संकष्टीला उठतात. दूर्वा काढायला हव्यात म्हणून सवयीने अंगणाकडे निघतात. बाहेर आल्यावर बघतात, तो अंगण कुठे आहे? साऱ्या फरसबंदी पोर्चवर हताशपणे डोळे फिरवतात. त्यांच्या घशात अडकलेला हुंदका कोणालाच ऐकू येत नाही.......

 एक आटपाट नगर होतं आणि नव्हतंही.

निखळलेलं मोरपीस / ९