पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४. इतिहासाचा साक्षात्कार


 सरदारसाहेबांनी दिलेल्या वेळेबरहुकूम मी त्यांच्या बंगल्यावर पोचलो. बंगला कसला, जुन्या काळची ऐतिहासिक गढीच होती ती. बाहेरच्या चौकी - पहाऱ्यांची शर्यत ओलांडून झाली. माझ्या कामाचे स्वरुप, नाव-गाव, वगैरेची रीतसर नोंद झाली. मला दिवाणखान्यात बसवण्यात आलं. नोकरांनी ट्रेमध्ये पाणी आणून ठेवले. इंटरकॉमवरुन सरदारसाहेब येत असल्याचं कळलं. मी पुन्हा माझ्या कामाची उजळणी केली. प्रश्न बघून ठेवले. अनेक ठिकाणी जाऊन आल्यामुळे तसं सगळं तोंडपाठ होतंच. म्हणून मी दिवाणखान्याचं निरीक्षण करीत बसलो. भिंतीवर मोठमोठे फोटो होते. बहुधा सरदारसाहेबांचे पूर्वज असावेत. शिकारीत मारलेल्या वाघांचे शिकाऱ्यांसमवेत फोटो होते. दुसऱ्या भिंतीवर जनावरांची मुंडकी लटकत होती. ढाल तलवार, भाले एकमेकांना कोन करुन रोवलेले होते. तिसरी भिंत बघत होतो. तेवढ्यात खुद्द सरदारसाहेबांचं आगमन झालं. माझ्या पाठीवर थाप मारत ते म्हणाले,

 "माझ्या तरुण मित्रा, तुझं इतिहासाचं प्रेम बघून मला आनंद वाटतो. नेमकं काय करायचा विचार आहे?"

 पहिल्याच भेटीत इतकी सलगी दाखवलेली पाहून मला बरं वाटलं. एरवी, त्यांची भक्कम देहयष्टी, अक्कडबाज मिशा आणि बरोबर असलेला लांडग्यासारखा कुत्रा बघून मी जरा दडपलेलाच होतो.

 "शिवकाळात आणि पेशवाईच्या उदयापर्यंत स्वराज्य संस्थापन आणि स्वराज्य संरक्षण या कामांमध्ये मराठा सरदारांनी जी बहुमोल कामगिरी बजावली, त्यातील प्रमुख घराण्यांविषयी सांगोपांग लिहायचा विचार आहे."

 "अरे बामणा, पेशव्यांसंबंधी लिहायचं सोडून मराठ्यांविषयी कशाला लिहित बसलास?"

 संभाषणाला असं वळण लागावं हे मला अजिबात रुचलं नाही. कदाचित् सरदारसाहेबांच्याही लक्षात ही नाराजी माझ्या चेहेऱ्यावरुन आली असावी. ते लगबगीने म्हणाले, “मित्रा, मी म्हटलं ते गमतीनं. मला आजवर आलेल्या अनुभवावरुन, तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल मला अजिबात शंका घ्यायची नाही. चल, आपण आधी नाश्ता करु. मग तुला हवी ती पुस्तकं आपण बघू. मघाचं विसरून जा. बाळासाहेबांनी फोनवरुन

निखळलेलं मोरपीस / ८७