पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मिळत होतं तेव्हा नम्रपणे नकार दिला. आम्ही मंडळी स्वातंत्र्यासाठी लढलो. देश स्वतंत्र झाला तेव्हाच आम्हाला आमची बक्षिसी मिळाली. आमची तत्त्वं आमच्यापाशी आणि आमच्यासाठीच. आता आपल्या निखिलला मेरीटमध्ये थोडे कमी मार्कस् मिळाले. डोनेशन द्यायला आपल्याकडं पैसा नाही. कुठून आणणार ऐंशी हजार रुपये ? आबा माझ्या शब्दासाठी निखिलला अॅडमिशन मिळवून देतोय. पूर्वीचे उपकार जाणून खुशीने देतोय तर कशाला त्रागा करायचा ? निखिलचं भविष्य बिघडवण्याचा आपल्याला काय अधिकार? आजकाल चालू असलेली ही व्यवस्था आपल्याला मान्य असो वा नसो. परिस्थितीशी आपल्याला जुळवून घ्यायलाच हवं."

 तत्त्वासाठी कधीही तडजोड न करणाऱ्या माझ्या त्यागी वडिलांचं हे नवं रुप बघून मी चकित झालो. त्यांचे एकेक शब्द माझ्या मेंदूच्या अंतर्भागापर्यंत जाऊन थडकत होते.....

 एका नव्या ‘जीवनव्यवस्थेत' सामील व्हायला मीपण निघालो होतो.

तडजोड / ८६