पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "अरे अशा सुरक्षित जागी त्याला लपविलं की त्यामुळं त्याचं आयुष्याचं कल्याण झालं."

 "म्हणजे?"

 "तुला आपले जेलर नाना जोशी आठवतात?"

 "हो. ते करड्या मिशांचे, भेदक डोळेवाले नाना."

 "तेच. ते त्यावेळी जेलर होते. ते आणि मी वर्गमित्र. मी त्याला जाऊन भेटलो. आबाची सगळी हकिगत सांगितली. नानाला त्याची दया आली. आबाच्या भीतीमध्ये थोडं तथ्य होतं. आपल्या घरात त्याला ठेवणं शक्य नव्हतं. घर छोटं आणि सारखी लोकांची वर्दळ. शेवटी नानालाच शक्कल सुचली. आबाला तुरुंगातच लपवायचा! आबाचं मौजे वडगांव त्यावेळी ब्रिटीश हद्दीत होतं तर आपला होता संस्थानी मुलुख. नानाच्या हातात सत्ता होती. आबाच्या अंगावर चक्क कैद्याचा पोशाख चढवला. चांगले तीन महिने लपवला. नानाने काय काय कागदपत्रं केली, का केलीच नव्हती देव जाणे. यथावकाश अण्णा सरपंचाला अटक झाली. शिक्षा झाली. आबाची मात्र तुरुंगात चैन झाली. आपल्या घरचा डबा जायचा. आबाचं वजन वाढलं. समाजातलं पण वजन वाढलं."

 "म्हणजे?"

 "आजचे तुझे मंत्री दिनकर अण्णा, मोहनराव त्याच वेळी तुरुंगात होते. आबा गोष्टीवेल्हाळ. त्याची सगळ्यांशी दोस्ती झाली. आबा तुरुंगात कसा आला ते फक्त नानाला आणि मला माहीत! स्वातंत्र्य मिळाल्यावर आबानं या दोस्तीचा चांगलाच फायदा उठवलान. मग पेट्रोलपंप काय, महामंडळ काय. चैनच चैन. आबाचा बघता बघता आबासाहेब झाला. त्याच्या शिक्षणसंस्थांचं नुसतं जाळं पसरलंय. आपल्या निखिलला इंजिनिअरींग कॉलेजची अॅडमिशन तोच देणार आहे."

 "काय? हाच तो माणूस? मग नकोच आपल्याला अॅडमिशन." मी आवेशाने म्हणालो.

 "मला माहिती आहे तुला आवडणार नाही ते."

 “आणि तुम्हाला पटणार आहे ते दादा ? आजवर आयुष्यात तुम्ही कुणापुढं कधीच हात पसरला नाही. मनात आणता तर आज......"

 दादांनी मला मध्येच थांबवलं. अर्धवट स्वत:शी आणि अर्धवट माझ्याशी बोलत ते म्हणाले,

 "असं वैतागून कसं चालेल? आयुष्यात स्वतःसाठी मी काही मागितलं नाही.

निखळलेलं मोरपीस / ८५