पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काळात दादांनी जमवून घेतलं असतं तर ते कुठच्या कुठच्या गेले असते. त्यांची विचारमग्नता भंग करीत मी म्हटलं,

 “पण मग तुरुंगात न जाता या आबांना पेन्शन तरी कशी मिळाली?"

 "अरे पेन्शन मिळवण्यासाठी तुरुंगातच गेलं पाहिजे असं थोडंच आहे? नुसती जेलरची सर्टिफिकेटस् मिळवून... पण ते जाऊं दे. निखिलच्या अॅडमिशनचे आधी बोलू."

 प्रचलित राजकारणाविषयी बोलायचं टाळत दादा म्हणाले.

 पण मी पिच्छा सोडला नाही तेव्हा दादांचा नाईलाज झाला. ते हसत हसत म्हणाले,.

 “अरे हा आबा खरोखरच तुरुंगात गेला होता."

 "आँ?" माझ्या आश्चर्यचकित चेहेऱ्याकडं पाहात दादा म्हणाले,

 “आबाची गंमत सांगतो पण तुझ्याजवळच ठेवायचं सगळं.”

 मी संमतीदर्शक मान हलवल्यावर दादा म्हणाले,

 "अरे आम्ही स्वातंत्र्याची चळवळ चालवत होतो तेव्हा आबा मौजे वडगावला होता. शेतात काम करत असतांना एकदा बांधावरुन जात होता. बाभळीच्या रानात शिरणार एवढ्यात समोरचं दृश्य पाहून त्याची बोबडीच वळली. अण्णा सरपंचानं कुन्हाडीनं कुणाचं तरी डोकंच उडवलेलं होतं! रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि त्याचवेळी अण्णा सरपंचाची नजर आबाकडं गेली. अण्णा आबाचा काटा काढण्यासाठी पुढं सरसावला. आबाला दरदरून घाम फुटला. खून करतांना आपण बघितलंय. म्हणजे मग आपण प्रत्यक्ष घटनेचे साक्षीदार होऊ शकतो. म्हणजे पुरावा नष्ट करण्यासाठी अण्णा आपल्यावरच कुऱ्हाड...?

 त्या ‘भयानक’ विचारासरशी आबा जीव तोडून पळत सुटला. गावाकडं पळता येणं शक्य नव्हतं. कारण वाटेवर रक्ताने माखलेली कुऱ्हाड घेऊन अण्णा पाटील उभा होता. आबा मागच्या मागं जो पाय लावून पळत सुटला तो कुठं न थांबता मोठ्या सडकेला लागला.' सापडेल ती बैलगाडी, मोटार करत करत थेट माझ्याकडं आला. भीतीनं त्याची दातखीळ बसल्यासारखी झाली होती. मग त्याला चहा पाजला. थोडा धीर दिला तेव्हा कुठं त्यानं तोंड उघडलं. सगळी हकीगत सांगितली. पण तोंडानं सारखं 'सरपंच मला जिता मारणार. मी त्याला खून करतांना बघितलंय. मला तो सोडणार नाही' असं सारखं बडबडत होता. मला कुठंतरी लपवा म्हणून मागं लागला."

 "मग कुठं लपवला?"

तडजोड / ८४