पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "बरंय, दादा, आता येतो पुढच्या पेन्सनच्या टायमाला."

 पेन्शन म्हटल्यावर माझे कान टवकारले. आबासाहेबांची गाडी हलल्यावर मी दादांना म्हटलं.

 "दादा, हे गृहस्थ पेन्शनीचं काय म्हणत होते?"

 "अरे, पेन्शन म्हणजे स्वातंत्र्यसैनिकाची. आपल्या घराजवळ ट्रेझरी ऑफिस आहे ना? तिथं पेन्शन न्यायला येतात. आधी इथं आपल्याकडं येतात. मला भेटतात. गप्पा मारतात आणि मग जातात. दर महिन्याचा असा कार्यक्रम असतो."

 "पण मारुती गाडी बाळगणाऱ्या माणसानं पेन्शन कशासाठी घ्यायची ? ब्रिटीश सत्तेविरुद्ध लाठ्या खाऊन, गोळ्या झेलून तुरुंगवास भोगलेल्या, गरीब क्रांतीकारकांसाठीच सरकारनं अशा योजना सुरु केल्या असतील ना?”

 "त्या योजना बाबा कागदावर असतात. त्याचा फायदा कसा उठवायचा, कुणी उठवायचा ते ज्यानं त्यानं आपापली विवेकबुद्धी वापरुन ठरवायचं.”

 मग बोलता बोलता दादा भूतकाळात गेले. नेहमीसारखे रंगून स्वातंत्र्यलढ्यातील हकिगती सांगू लागले. शिंदे, वाघमारे, दत्ताजी पाटील लपत-छपत कसे घरी यायचे, पत्रके ठेवायचे, पुढच्या पार्टीसाठी बंदुका, दारुगोळा ठेऊन जायचे. शाळा सुटल्यावर विश्वासातील दामू शिपायाच्या मदतीने आपण पत्रके कशी पोचती करायचो हे सांगण्यात गुंगून गेले.

 मध्येच त्यांची तंद्री भंग करत मी म्हटलं,

 "पण दादा, तुम्ही सांगता त्या हकीगतींमध्ये या आबासाहेबाचं नाव मी कधी ऐकलं नव्हतं."

 "कसं ऐकणार? आबा म्हणजे मुलखाचा भित्रा माणूस. तो कशाला लाठ्या खायला घराबाहेर पडतोय?"

 "मग हे स्वातंत्र्यसैनिकाचं पेन्शन ?..." मी आश्चर्यानं विचारलं.

 “हंऽऽ” दादांनी एक सुस्कारा सोडला.

 मी मनाशी म्हटलं. ठीक आहे. म्हणजे कापडाचं दुकान, पेट्रोलपंप असणारे, मारुतीतून हिंडणारे हे आबासाहेब, फुकटची पेन्शन खातात हे निदान मनोमनी तरी दादांना पटत नसावं. मी संघवाला आणि ते काँग्रेसवाले. आमच्या राजकारणावरुन नेहमीच चकमकी झडायच्या. त्यांच्या स्वभावाप्रमाणे उघडपणं ते कधी कुणाला नावं ठेवायचे नाहीत की कुणाला गोंजारायचे नाहीत. नव्या राजकारणाशी स्वातंत्र्योत्तर

निखळलेलं मोरपीस / ८३