पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३. तडजोड


 मला गार वाऱ्याने जाग आली तेव्हा घड्याळात पहाटेचे साडेपाच वाजले होते. महालक्ष्मी एक्सप्रेसने बहुधा कराड स्टेशन नुकतंच सोडलं असावं. कारण बाहेरच्या शेतीवाडीवरून किर्लोस्करवाडी येत असावं. आता निखिलला उठवायला हवं. त्याला सकाळचं उठवायचं म्हणजे अगदी हलवायला लागतं. त्याच्या शांत, निरागस चेहेऱ्याकडं बघून मला त्याची दया आली. बिचाऱ्यानं वर्षभर छान अभ्यास केला. आता पी.सी.एम्. ग्रुपमध्ये ८४% मार्क्स म्हणजे काही कमी नव्हते. पण इंजिनिअरींगच्या अॅडमिशनला कमी होते. निदान ज्या जातीत तो जन्मला होता, त्यासाठी तर नक्कीच कमी होते. त्याचे इतर मित्र त्याच्यापेक्षा कमी मार्कस् मिळवूनही त्याच्यापुढं जाणार होते.

 तो आणि त्याच्यासारखे अनेकजण या विचित्र व्यवस्थेचे बळी ठरणार होते. ॲडमिशन न मिळाल्याने नैराश्यापोटी आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा विषय रात्री त्याच्या बोलण्यात आला तेव्हा माझ्या काळजात गलबललं. हर प्रयत्नानं मी संभाषणाची गाडी हलक्या-फुलक्या विषयावर आणली. त्यामुळे पुणे स्टेशन सोडेपर्यंत आम्ही जागे होतो. रात्री झोपलो तेव्हा एक वाजून गेला होता.

 सांगली स्टेशन आल्यावर रिक्षाने घरी आलो. दादा म्हणाले म्हणून वरच्या माडीत झोपून गेलो.

 दोन तास अगदी छान झोप लागली. सकाळचे ९ वाजून गेले होते. निखिल अजून झोपलाच होता. वहिनी म्हणाली की त्याला झोपू दे. मुखमार्जन करुन मी चहा घेत होतो, वृत्तपत्रावरुन नजर टाकत होतो. तेव्हा फाटकापाशी गाडीचा हॉर्न ऐकला.

 बाहेर एक मारुती थांबली होती. त्यातून एक रुबाबदार गृहस्थ उतरले. कडक इस्त्रीचा लेंगा, सिल्कचा झब्बा, हातात एक उंची लेदर बॅग. दादांनी दारातच त्याचं स्वागत केलं.

 "या, या, आबासाहेब या."

 मग दादांच्या आणि त्यांच्या गप्पा बऱ्याच वेळ चालल्या होत्या. चहापाणी झालं. निघताना आबासाहेब म्हणाले,

तडजोड / ८२